छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नावे दक्षिण भारतात चलनात आणलेले ‘चांदीचे होन’, ‘पेनी ब्लॅक’ हा १८४० सालातील जगातील पहिला पोस्ट स्टॅम्प, १८५२ मधील आशियातील पहिला स्टॅम्प.. अशा अतिशय दुर्मीळ व ऐतिहासिक वस्तू पुणेकरांना पाहण्याची संधी मिळणार आहे.. निमित्त आहे ११ ते १३ डिसेंबर या काळात भरणारे ‘कॉइनपेक्स पुणे २०१२’ प्रदर्शन!
‘इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आइटेम्स’ च्या वतीने ११ ते १३ डिसेंबर दरम्यान कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल येथे निवडक स्टॅम्प संग्राहकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यात एकूण ५० स्टॅम्प संग्राहक प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत. महापेक्स या राज्यस्तरीय पोस्टल स्टॅम्पच्या स्पर्धेत ‘इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटीच्या ९ स्पर्धकांच्या पोस्टल स्टॅम्प संग्रहाला सुवर्णपदक मिळाले. त्यांचा संग्रह या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल कर्नल के. सी. मिश्रा, व्हीएसएम यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दुर्मीळ पोस्टल स्टॅम्प संग्रहाबरोबरच जगातील पहिला पोस्टाचा स्टॅम्प पेनी ब्लॅक (१८४०), आशियातील पहिला स्टॅम्प- सिंध प्रांत (१८५२) आणि शिवाजीमहाराजांच्या नावे दक्षिण भारतात चलनात आणलेले चांदीचे होन, शिवाजी महाराजांच्या काळातील नीळा, लाल, आणि पांढरा सिंध डाक अशा अतिशय दुर्मीळ असणाऱ्या वस्तू या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. यावेळी मरुधर आर्ट्स, बेंगलोर यांचा नाणी व स्टॅम्पचा लिलाव आयोजित केला आहे, दुर्मीळ स्टॅम्प व नाणी खरेदी करण्याची संधी पुणेकरांना आहे.