‘जुनं ते सोनं’ या उक्तीचा प्रत्यय मोठय़ा पडद्याप्रमाणेच छोटय़ा कलाकारांच्या बाबतीतही अनुभवायला मिळतो. बॉलिवुडमध्ये आज अनेक नवीन चेहरे आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत असले तरी वर्चस्व मा़त्र चाळीशी ओलांडलेल्या खानत्रयींचे आहे. छोटय़ा पडद्यावरही गेल्या दोन-तीन वर्षांत नवीन कलाकारांनी आपले बस्तान बसवले होते.

मात्र, दूरचित्रवाहिन्यांच्या विश्वात बदल घडविण्यात प्रसिद्ध असलेल्या एकता कपूरने ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेतून पुन्हा एकदा राम कपूर आणि साक्षी तन्वर या आपल्या दोन जुन्या हुकमी कलाकारांना परत आणले साक्षी आणि रामला इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांची मिळालेली पसंती पाहून अन्य वाहिन्यांनी या दोघांबरोबर गाजलेल्या समकालीन कलाकारांना मुख्य प्रवाहातील मालिकांमध्ये तेही मध्यवर्ती भूमिकेत परत आणण्याचा सपाटाच लावला आहे. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी छोटा पडदा गाजविणाऱ्या मोना सिंग, रोनित रॉय, मौली गांगुली, श्वेता तिवारी, अमना शरीफ, नारायणी शास्त्री, देलनाझ पॉल, मानव गोहिल, शरद केळकर, करिश्मा तन्ना, शमा सिकंदर, अली असगर, हितेन तेजवानी, इक्बाल खान अशा कलाकार मंडळींनी पुन्हा एकदा छोटा पडदा व्यापून टाकल्याचे दिसत आहे. उशिरा का होईना, दिग्दर्शकांना आम्ही चांगले कलाकार आहोत, याची जाणीव झाली इथपासून ते साक्षी आणि रामसारख्या कलाकारांना मिळालेल्या यशामुळेच हा बदल झाला आहे अशी अनेक कारणे हे कलाकार सांगितात. पण, छोटय़ा पडद्यासाठी साक्षी तन्वर, राम कपूर, रोनित रॉय सारखी मंडळी ‘ट्रेंडसेटर’ ठरली यावर मात्र या सगळ्यांचे एकमत आहे.

‘जुन्या कलाकारांनी छोटय़ा पडद्यावर परतण्याची हीच वेळ’
सोनी वाहिनीवर ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतून मोना सिंगने छोटय़ा पडद्यावर पदार्पण केलं होतं. मोठया फ्रेमचा चष्मा लावणारी, दात पुढे आलेली, कुरूप चेहऱ्याची ही ‘जस्सी’ अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मात्र, ही मालिका संपल्यानंतरमोनाने आपला मोहरा रिअ‍ॅलिटी शोकडे वळवला होता. त्यानंतर ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातही तिने काम केलं. आज सहा वर्षांच्या गॅपनंतर मोना सोनीवरच्याच ‘क्या हुआ तेरा वादा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे आणि या मालिकेतील ‘मोना भाभी’ही तितकीच लोकप्रिय झाली आहे. ‘जस्सीच्या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी मी मुद्दामच रिअ‍ॅलिटी शोकडे वळले होते. त्या काळात मी एक सूत्रसंचालक, एका डान्स रिअ‍ॅलिटी शोची स्पर्धक, चित्रपटातून केलेली भूमिका अशा विविध रूपात लोकांसमोर आले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर मोहनीश बहल, साक्षी, राम कपूर आणि रोनित रॉयसारख्या कलाकारांना दूरचित्रवाहिन्यांवर मुख्य भूमिका करायला मिळत आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वत़ला सिध्द केलं आहे, हे पाहिल्यानंतर परतण्याची हीच योग्य वेळ आहे, असा विचार माझ्या मनात आला’.
‘जस्सीनंतर माझ्याकडे अनेक भूमिका आल्या पण ते कांजीवरम साडया नेसून, मोठं सिंदूर भरून स्वयंपाकघरात वावरणाऱ्या तथाकथित नायिका साकारण्यात मला अजिबात रस नव्हता.
‘क्या हुआ तेरा वादा’ ही मालिका एका मध्यमवर्गीय विवाहित स्त्रीच्या आयुष्यावर बेतलेली आहे, त्यामुळे ही भूमिका मला वेगळी वाटली आणि ती आव्हान म्हणून मी स्वीकारली. आत्ताच्या मालिका पाहिल्यानंतर टेलीव्हिजन पुन्हा एकदा आपल्या मुलभूत विचारांकडे परतलं आहे, असा विश्वास वाटतो आणि म्हणूनच जुन्या कलाकारांनी छोटय़ा पडद्यावर परतण्याची हीच योग्य वेळ आहे, असं मला वाटतं.
काल्पनिक मालिका पुनरागमनासाठी योग्य वाटली
‘कहानी घर घर की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे अली असगर. अली मुळातच विनोदी अभिनेता असल्यामुळे अनेक कॉमेडी शो आणि चित्रपटांमधून अलीने आपला ठसा उमटवला आहे. ‘फु बाई फु’सारख्या मराठमोळ्या विनोदी रिॅअ‍ॅलीटी शोचा परीक्षक म्हणूनही त्याने काम पाहिलं पण, तरीही मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत परतण्यासाठी त्याला वाट पहावी लागली. ‘अगदी मोकळेपणाने सांगायचं तर ‘कहानी घर घर की’नंतर मला कुठल्याच चांगल्या मालिकांसाठी विचारणा झाली नाही. रिअ‍ॅलिटी शो आणि चित्रपटांमुळे मी कामात व्यस्त होतो. पण, ‘जीनी और जुजू’ ही मालिका म्हणजे या माध्यमात परतण्यासाठीचं एक चांगलं कारण होतं.
‘आय ड्रीम ऑफ जीनी’ या मूळ इंग्रजी मालिकेवर बेतलेली असल्याने या कार्यक्रमाची शैली आणि मांडणी पूर्णत वेगळ्या प्रकारची आहे. यात मी एका पायलटची मध्यवर्ती भूमिका करतो आहे.
पुनरागमनासाठी यापेक्षा आणखी चांगली संधी मला मिळाली नसती.’
दिग्दर्शकांना आमच्या गुणवत्तेची जाणीव झाली
कधी नायिका कधी खलनायिका.. एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी..’ पासून आत्तापर्यंतच्या अनेक मालिकांमध्ये खलनायिकाही तितक्याच गाजलेल्या आहेत. शमा सिकंदरने आपल्या कारकिर्दीत नायिका आणि खलनायिका दोन्ही साकारल्या आहेत. बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर ‘बालवीर’ या मालिकेतून ती भयंकर परीच्या भूमिकेत दिसते आहे. ‘माझ्यासाठी नकारात्मक भूमिका करणे हे सुध्दा एक आव्हान आहे. मध्यंतरीच्या काळात निर्माता-दिग्दर्शकांनी चांगल्या भूमिकांसाठी कधी विचारणाच केली नाही. तुम्ही एकदा नाव कमावल्यानंतर उगाचच कुठलीतरी छोटी भूमिका करायची आणि मनाचं समाधान करून घ्यायचं हे पटणारं नव्हतं. उशिराने का होईना निर्माता-दिग्दर्शकांना आमच्यासारख्या जुन्या कलाकारांच्या गुणवत्तेची जाणीव झाली’.

मालिका तुम्हाला सतत व्यग्र ठेवतात – करिश्मा तन्ना
मालिका-रिअ‍ॅलिटी शोज आणि चित्रपट असे वेगवेगळे मार्ग चोखाळल्यानंतर अभिनेत्री करिश्मा तन्नाने ‘सब’ वाहिनीच्या ‘बालवीर’ या मालिकेतून पुनरागमन केले आहे. ‘बालवीर’ हा जादुई विषयावरचा कार्यक्रम असल्याने त्यात करिश्मा राणी परीच्या भूमिकेत आहे. ‘मालिकांचे वेळापत्रक तुम्हाला रोजच्यारोज कामात अडकवून ठेवतं. तुम्हाला साधा मोकळा श्वासही घेता येत नाही इतकं तुम्ही त्या दैनंदिन मालिकांच्या चित्रिकरणात अडकून जाता. आणि म्हणूनच दोन वर्ष मी या माध्यमापासून पूर्णत दूर राहणं पसंत केलं. या दरम्यानच्या काळात मिळालेल्या वेळेचा पूर्ण सदुपयोग करून घेतला. फिरणं असेल, पटकथा वाचणं असेल स्वतला आनंदी ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सगळ्या मी केल्या. या माध्यमापासून दूर राहण्याचा निर्णय माझा स्वत:चा होता त्यामुळे माझी कुठलीच तक्रारही नाही. त्यामुळे या माध्यमाकडे बालवीरच्या निमित्ताने परततानाही माझ्याकडे दोन मुख्य कारणं होती एक म्हणजे निर्माता विपुल शहा. बालवीर हा लहान मुलांच्या जादुई विश्वावर आधारित असल्याने या शोची शैलीच वेगळी होती. आणि दुसरं ‘सब’ टीव्हीसारखी कौटुंबिक प्रेक्षक असलेली वाहिनी. या मालिकेमुळे माझ्या जुन्या कलाकारांबरोबर काम करायला मिळतंय त्यामुळे एकंदरीतच हे पुनरागमन माझ्याकरता आनंदाची उधळण करणारं आहे’.

छोटय़ा पडद्यापासून लांब राहण्याची माझी कारणे वेगळी – मानव गोहिल
‘कहानी घर घर की’, ‘कुस्सूम’ आणि ‘सारा आकाश’ सारख्या विविध मालिकांमधून आपला ठसा उमटवणारा अभिनेता मानव गोहिल ‘द बडी प्रोजेक्ट’ या आगामी शोमधून पुनरागमन करतो आहे. ‘सुरूवातीला या माध्यमापासून दूर राहण्याची माझी कारणं वेगळी होती. पण, मी पुन्हा मालिका करण्यासाठी तयार झालो त्यावेळी एकतर माझं वय त्या भूमिकांना साजेसं नव्हतं. कधी त्यांना भूमिकेसाठी मी फार तरूण वाटायचो तर कधी मला फारच मानधन द्यावं लागतंय असं त्यांचं म्हणणं होतं. अशा कारणांमुळे मग मालिका माझ्याकडे यायच्या आणि निघून जायच्या. त्यात मी थिएटरही करत होतो आणि दुसरीकडे माझी स्वतची कंपनी सुरू केली होती. त्यामुळे परतण्याची मी घाई केली नाही. ‘द बडी प्रोजेक्ट’मध्ये मी प्राध्यापकाची भूमिका करतो आहे. तरूणाईचा सळसळता उत्साह आणि पूर्ण वेगळा विषय त्यामुळे पुन्हा एकदा मी त्या व्यस्त चक्रात अडकलोय पण त्यातही आनंद वाटतो आहे’.

एक चक्र पूर्ण झालं – नारायणी शास्त्री
‘झी’टीव्हीच्या ‘पिया का घर’ची ‘रिमझिम’ म्हणून नारायणी शास्त्री पहिल्याच मालिकेत लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने काही मालिका केल्या. ‘पक पक पकाक’ सारख्या मराठी चित्रपटातूनही तिने काम केलं. सध्या ती झी टीव्हीच्या ‘फिर सुबह होगी’ या मालिकेत काम करते आहे. ‘गेल्या दोन वर्षांत माझ्याकडे चांगल्या मालिकांचे प्रस्तावच आले नाहीत. काही दिवसांनंतर तर निर्माता-दिग्दर्शकांनी फिरकणंही बंद केलं होतं. पण, त्याचा विचार करणं मी सोडून दिलं होतं. उलट या सुट्टीचा मी मनमुराद आनंद घेतला. पूर्वी मालिकांच्या व्यस्त वेळापत्रकांमुळे कुटूंबियांबरोबर फिरायला जाणं की स्वतसाठी वेळ देणं हे प्रकारच होत नव्हते. या दोन वर्षांत मी पर्यटन केलं, पुस्तकं वाचली, मित्रमैत्रिणींबरोबर फिरले. त्यानंतर मराठी चित्रपटही केले. पण, आता माझ्यावेळचे सगळेच कलाकार पुन्हा वेगवेगळ्या वाहिन्यांवर काम करताहेत हे पाहून खूप आनंद झाला. आमचं एक चक्र पूर्ण झालं आणि आत्ता कारकिर्दीची नवी खेळी सुरू झाली आहे.’