शाहूपुरी रेल्वे स्थानकासमोर अज्ञाताचा खून होण्याचा आणखी एक प्रकार गुरूवारी उघडकीस आला. या भागातील गेल्या चार महिन्यातील अशाप्रकारचा हा आठवा खून आहे. अज्ञात, बेवारस अशी खुनाची नोंद पोलीस दफ्तरी केली जाते. मात्र खुनाचा नेमका शोध घेण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे आजवरच्या त्यांच्या तपासाच्या दिशेवरून स्पष्ट होत आहे.     
येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बस स्टॉपसमोर अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याचा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आला. सुमारे पस्तीस वर्षीय तरूणाचा निर्दयी खून केल्याचे घटनास्थळी दिसत होते.डोक्यात धारधार हत्याराचा वार करून खून करण्यात आला आहे. हल्लेखोराने मृतदेह कांही अंतर ओढत नेला होता. परिणामी घटनास्थळी मृतदेहाचे रक्त जागोजागी पडले होते. ही भीषणता इतकी होती, की महापालिकेचा अग्निशामक दलाचा बंब बोलावून हा परिसर स्वच्छ करावा लागला. शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.     
दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरातील अशाच पध्दतीने खून होण्याचा हा आठवा प्रकार आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी असे प्रकार घडल्यानंतर प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. पोलीस दफ्तरी केवळ बेवारस व्यक्तीचा मृत्यू अशी नोंद केली जाते. अज्ञात व्यक्तीकडून खून सत्र सुरू असल्याचा आरोपही देसाई यांनी केला होता. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी वा फुटपाथवर झोपणारे भिकारी यांचा पैशाच्या हव्यासातून खून केला जात असावा, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. पोलीस अशा मृतदेहांची नोंद बेवारस म्हणून करतात आणि मृतदेहांना दहन केले जाते. वास्तविक बेवारस मृतदेहांचे दफन करणे आवश्यक आहे,तथापी पोलीस मात्र या तांत्रिक गोष्टीकडे कानाडोळा करतात. परिणामी हल्ल्याची घटना नेमकी कशामुळे घडली याचे खरे कारण मात्र गुलदस्त्यातच राहते. तसेच बेवारस व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची प्रसिध्दी करण्याकडेही पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत असते.     
गुरूवारी पुन्हा एकदा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रजासत्ताकचे देसाई यांनी पोलीस यंत्रणेच्या तपासाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाहूपुरी पोलिसांना सलग आठ खुनांचा तपास करणे कार्यबाहुल्यामुळे शक्य नसेल तर सक्षम अधिकारी नियुक्त करून त्याकरवी या प्रकरणाचा तडा लावण्याची मागणी त्यांनी केली. झिया खानसारख्या सेलिब्रेटिने आत्महत्या केल्यानंतर त्याचा तपास होवून आरोपीला पोलीसांकडून तात्काळ अटक केली गेली. मात्र रस्त्यावर झोपणाऱ्या गरिबांचा खून होऊनही त्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत राहतात.यामुळे कायद्यापुढे सर्वजण समान असल्याच्या तत्त्वाला हरताळ फासला जात आहे. कोल्हापुरात अशाप्रकारचे आणखी किती खून होईपर्यंत पोलीस वाट पाहत राहणार असा संतप्त सवाल त्यांनी केला.