तसा हा ‘चेहरा’ नेहमीच जाहीर कार्यक्रमांमध्ये भेटणारा. त्याचे कोणी कधी नाव-गाव विचारत नाही. कोठून आले, जेवले का असेही कोणी पुसत नाही. पण एखादा नेता भाषणाला उभा राहिला किंवा एखाद्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले की, छातीचा भाता करून तो सारी हवा नळीत फुंकतो आणि तुतारी वाजू लागते.. अलीकडे राजकीय वातावरण ढवळू लागले आहे आणि तुतारीवालेही दिसू लागले आहेत. पण तुतारी वाजवायची असेल तर किती खर्च येतो, माहीत आहे? एका कार्यक्रमाला तब्बल आठ हजार रुपये! मुंबईत तुतारी वाजविणाऱ्यांचा ५० जणांचा एक संचच आहे. राज्यात कोठेही कोणाचाही जाहीर कार्यक्रम असो, त्याच मध्ययुगीन पोशाखात तुतारी हातात घेऊन ती फुंकणारा माणूस तसा ‘हायटेक’ झाला आहे. दादरमधील भोसले ग्रुपने जागोजागी तुतारी वाजविण्याचे कंत्राट मिळविले आहे. शुक्रवारच्या काँग्रेसच्या सेवा दलाच्या कार्यक्रमातही सगळ्या प्रमुख नेत्यांच्या भाषणाआधी भोसले ग्रुपच्या दोघांनी तुतारी वाजवली.
खरे तर तुतारी हे रणवाद्य. मराठी सारस्वतांच्या जगातही तुतारीचे तसे आगळे महत्त्व थेट केशवसुतांनीच वर्णिले आहे. ‘एक तुतारी दे मज आणुनि, फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदुनि टाकीन सगळी गगने’. सकाळी साडेदहाच्या सुमारास केशवसुतांच्या या ओळी भोसले ग्रुपमुळे अनेकांना आठवल्या.
नेता येण्यापूर्वी घाईघाईत बोलताना एकजण म्हणाला, ‘‘मुंबईत आमचा ५०जणांचा संच आहे. ज्या कार्यक्रमाचे आमंत्रण येते, त्यांच्याकडून आठ हजार रुपये घेतो. जवळ असेल तर येण्या-जाण्याचा खर्च घेत नाही. पण आता मागणी वाढली. आज औरंगाबादला, उद्या परभणी नि अंबाजोगाई येथेही कार्यक्रमासाठी बोलविले आहे.’’
वीररसाचे प्रकटीकरण व्हावे म्हणून तुतारी वाजविली जात असे. काही पौराणिक चित्रपटांमध्ये तुतारी वाजविली गेली आणि ती अनेकांना आवडली. त्यानंतर एका चित्रपट कंपनीने तुतारी वाजविणारा माणूस हेच त्याचे बोधचिन्ह ठेवले होते. लष्करात ‘तूर्य’ असा शब्द वापरला जात असे. तुतारीला ‘शृंग’ असाही शब्द वापरला जातो. शिंग हा त्याचा अपभ्रंश. जनावरांच्या शिंगातील पोकळ भागात हवा फुंकून त्याच्यावर मिळविलेला विजय उन्मादात साजरा करण्यासाठी हे वाद्य तयार झाले असावे, असा याचा इतिहास सांगतात. अलीकडे तुतारीच्या वरच्या भागाला सनईला लावतात तशी वेगळी पिपाणी मिळते. ती फुंकताना फारसा दमसास लागत नाही. अलीकडे निवडणुकीच्या काळात तुतारीवाले दिसू लागले आहेत. हा तसा बिनचेहऱ्याचा माणूस तुतारी फुंकून बऱ्यापैकी कमावतो आहे.