राज्यभरात अभियांत्रिकीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मेडिकलची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १२ जून पासून सुरू होणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने जारी अधिसूचनेनुसार अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी एमटी-सीईटी आणि जेईई मेन परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी अर्ज करण्यास पात्र आहेत. प्रोव्हिजिनल मेरीट यादी १६ जूनला सायंकाळी ५ वाजता जारी केली जाणार आहे. विभागातर्फे शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये आवेजन स्वीकार केंद्रे (एआरसी) तयार करण्यात आली असून इच्छुकांना १३ जूनपर्यंत अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन अर्ज १४ जूनला ‘कंफर्म’ होईल. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (केप) पहिल्या फेरीतील पहिली मेरीट यादी १६ जूनला जाहीर केली जाईल. याविषयी काही तक्रार असल्यास १८ जूनपर्यंत संपर्क साधता येईल. अंतिम मेरीट यादी १९ जूनला सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाणार आहे. केप राऊंड -१ चे ऑनलाईन ऑप्शनन फॉर्म १७ ते १९ जून यादरम्यान भरले जातील, यात विद्यार्थ्यांच्या पर्यायी महाविद्यालयाची नावे मागविण्यात आली आहेत.
पहिल्या फेरीत प्रोव्हिजन अलॉटमेंट २६ जूनला सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाईल. या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांना २६ जून ते २८ जूनदरम्यान महाविद्यालयात संपर्क साधावा लागेल. यानंतर जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या फेरीत त्या भरल्या जातील. संस्थांमधील रिक्त जागांची स्थिती १ जुलैला जाहीर केली जाईल. याच आधारावर दुसऱ्या फेरीतील ऑप्शन फॉर्म २ ते ४ जुलै दरम्यान भरता येतील आणि ६ जुलैला प्रोव्हिजिनल अलॉटमेंट केले जाईल. या विद्यार्थ्यांना ६ ते १० जुलैच्या दरम्यान महाविद्यालयात प्रवेशासाठी संपर्क साधावा लागेल. दुसऱ्या फेरीतही जागा रिक्त राहिल्यास १२ जुलैला तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार असून डीटीईच्या संकेतस्थळावर रिक्त जागांची यादी टाकण्यात येणार आहे. केप राऊंड – ३ च्या समुपदेशनाचा प्रारंभ १६ जुलैला होणार असून तो १८ जुलैपर्यंत चालेल. या विद्यार्थ्यांना १६ ते २० जुलैदरम्यान महाविद्यालयांशी संपर्क साधावा लागेल.
वैद्यकीय अभ्यासप्रकमाची प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरू होणार असून राज्यभरातील शासकीय, अनुदानित, मेडिकल, आयुर्वेदिक, नर्सिग आणि होमिओपॅथ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेतून जावे लागणार आहे. ऑनलाईन इन्फर्मेशन सबमिशन सुविधा २० जूनपर्यंत राहील. विद्यार्थ्यांना काऊन्सिलिंग, दस्तावेजांची पडताळणी आणि प्रीफरन्स फॉर्म भरण्याची प्रक्रिया जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण व अनुसंधान संचालनातर्फे जारी अधिसूचनेनुसार विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर उपलब्ध आराखडय़ातच एनईईटीचे आकडे भरावयाचे आहेत.