जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात पावसाची संततधार आणि पूर्व भागात पावसाची तुरळक हजेरी असे चित्र सोमवारी होते. शहरात पावसाची उघडझाप दिवसभर सुरू होती. पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून येत राहिल्या. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्य़ात १९.३३ मि.मी.इतका सरासरी पाऊस झाला.     
मृग नक्षत्रावर सुरू झालेला पाऊस जिल्ह्य़ात सर्वच ठिकाणी कायम आहे. मात्र डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण जादा आहे. पश्चिमेकडील तीन-चार तालुक्यांमध्ये चांगली वृष्टी होत असल्याचे वृत्त आहे. शिरोळ, हातकणंगले, कागल या तालुक्यांत मात्र पावसाची जेमतेम हजेरी आहे. कोल्हापूर शहरातही पावसाचे प्रमाण या तुलनेत मध्यम राहिले. पावसाळी वातावरण कायम असले तरी अजूनही पावसाने जोर धरलेला नाही. अधूनमधून कोसळणाऱ्या हलक्या सरींमुळे जनजीवन मात्र विस्कळीत होत आहे.     
जिल्ह्य़ातील गेल्या चोवीस तासांतील पावसाचे प्रमाण याप्रमाणे. गगनबावडा- ७२ मि.मी., राधानगरी – ३४ मि.मी., चंदगड – २७ मि.मी., आजरा – १५ मि.मी., भुदरगड – ११ मि.मी., करवीर – ५.७ मि.मी.,पन्हाळा – २७ मि.मी., शाहूवाडी – ३३ मि.मी., गडहिंग्लज – ५ मि.मी., हातकणंगले – ७  मि.मी., कागल -६ मि.मी. व शिरोळ – २ मि.मी.