गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील पंचेचाळीसावा लेख..
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस, महसूल, विधी व इतर शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. नेहमीच्या प्रशासकीय कामकाजापेक्षा या मोहिमेतील कामकाज हे वेगळ्या स्वरूपाचे असल्याने विकास, प्रशासकीय व पोलीस यंत्रणेने समर्पित भावनेने ते करणे अभिप्रेत आहे. या पाश्र्वभूमीवर, शासनाने मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सन्मानित करण्याची संकल्पना मांडली आहे. तथापि, तंटामुक्त गाव अन् प्रसिद्धीसाठी आर्थिक स्वरूपात पुरस्कार देताना शासनाने आपल्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांची केवळ सन्मानपत्रावर बोळवण केली आहे.
मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीचे मूल्यमापन करून संबंधितांना गौरविण्यासाठी शासनाने महसुली विभाग, पोलीस परिक्षेत्र, जिल्हा, तालुका, पोलीस ठाणे व गावपातळी या सर्वाचा साकल्याने विचार केल्याचे दिसून येते. मोहिमेच्या अंमलबजावणीच्या वर्षांत तंटामुक्त गावांची टक्केवारी इतर विभागांपेक्षा अधिक असणाऱ्या विभागाच्या आयुक्तांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानपत्र प्रदान केले जाते. राज्यातील सातपैकी ज्या पोलीस परिक्षेत्रात या मोहिमेची सवरेत्कृष्ट अंमलबजावणी होईल, अशा पोलीस परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनाही त्याच पद्धतीने गौरविले जाते. महसुली विभागातील ज्या जिल्ह्याने चांगली कामगिरी केली, तेथील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सन्मानपत्र दिले जाते. प्रत्येक जिल्ह्यातून ज्या तालुक्याची उर्वरित तालुक्यांच्या तुलनेत सरस कामगिरी असेल, तेथील तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. या मोहिमेची खरी धुरा स्थानिक पातळीवर पोलीस ठाणे सांभाळत असते. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सवरेत्कृष्ट अंमलबजावणी केली जाते, अशा पोलीस ठाण्याच्या प्रमुखास सन्मानपत्र प्रदान केले जाते. या मोहिमेत गावपातळीवरील घटक सक्रियपणे कार्यरत असतो. त्यांच्या कार्याची दखलही घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या तंटामुक्त गावातील बीट हवालदार, गाव कामगार तलाठी व ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी यांना सन्मानपत्र प्रदान केले जाते. ही निवड करण्यासाठी शासनाने खास समिती गठित केली आहे. या मोहिमेत तंटामुक्त गाव व प्रसिद्धीसाठी आर्थिक स्वरूपात पुरस्कार दिले जातात. परंतु, शासकीय यंत्रणेला केवळ सन्मानपत्रावर समाधान मानावे लागते. या निकषात त्या अनुषंगाने बदल करावेत, अशी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भावना आहे.
जनजागृतीला हातभार
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यात पोलीस, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी यांच्यामार्फत अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांवर ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’ने लेखमालेद्वारे प्रकाशझोत टाकला. वास्तविक, नंदुरबार जिल्ह्यात आदिवासीबहुल वस्ती. दुर्गमता, अशिक्षितपणा यातून अंधश्रद्धेचे प्राबल्य. डाकीण नावाचा लागलेला जणू कलंक. वर्षांनुवर्षे चाललेल्या या कुप्रथेने अनेकांना भोग भोगायला भाग पाडले. ही अनिष्ट प्रथेला रोखण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे यावर केवळ चर्चा केली जात होती. या जिल्ह्यात नव्याने आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर काम करणारे कार्यकर्ते आणि तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी व सदस्य यांना एकत्र आणले आणि या प्रथेच्या मुळावर घाव घालण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला. या सर्व घटनाक्रमांचा वेध ‘गाव तंटामुक्त, सर्वागयुक्त’ या लेखमालेतून घेण्यात आला. त्यामुळे जनजागृतीला हातभार लागला आहे.
– डॉ. कांतिलाल टाटीया, शहादा, नंदुरबार