कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रशासकीय कामात मोठय़ा प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वाढू लागताच याप्रकरणी शासनाच्या नगरविकास विभागाने ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून शासन आणि जिल्हाधिकारी यांच्यात पत्रव्यवहार सुरू आहे.
महापालिकेतील या गैरव्यवहाराच्या प्रकरणात माजी आयुक्त गोविंद राठोड यांच्यासह जे कर्मचारी, अधिकारी दोषी आढळतील त्यांची सविस्तर चौकशी करून त्याचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. १० जुलै रोजी या चौकशीबाबतचे पत्र ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना नगरविकास विभागाचे उपसचिव ज. ना. पाटील यांनी पाठविले आहे.
कल्याण भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी २०१० मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत झालेल्या प्रशासकीय अनियमितता, गैरव्यवहारा संदर्भात एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने याबाबत शासनाला स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.  
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नगरविकास विभागाने जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांच्याकडे पालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  याबाबत जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांच्याशी चार ते पाच दिवस सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.