जिल्हा परिषद स्तरावर प्रतिनियुक्तांना परवानगी नसतानाही पदाधिकारी व पुढाऱ्यांच्या मर्जीतील जवळपास ४००पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य़ पद्धतीने प्रतिनियुक्त्या करून आपले काम सोपे केले. मात्र, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांनी पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या त्वरित रद्द करण्याचे आदेश बजावले आहेत. जावळेकरांच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
जिल्हा परिषदेत नियम बासनात गुंडाळून मनमानी कारभार सुरू आहे. जि.प. स्तरावर प्रतिनियुक्त्या करण्याचे अधिकार नसतानाही ४०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी तोंडी प्रतिनियुक्त्या करून आपली सोय केली. बदलीचा कालावधी संपल्यानंतर आता प्रतिनियुक्तयांचे अधिकारही विभागीय पातळीवर आहेत. असे असले, तरी मागील काही दिवसांत शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत अनेकांनी प्रतिनियुक्त्या करून घेतल्या. अनेक ठिकाणी जागा भरल्या असल्याचे कागदावर दिसत असले, तरी प्रत्यक्षात मात्र कर्मचारी नसतात. या बाबत अनेक तक्रारी होऊनही पदाधिकारी व पुढाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना मूळ जागी काम करायला लावायची हिंमत कोणीच दाखवत नव्हते.
जावळेकर यांनी पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्व विभागप्रमुखांना आपापल्या विभागातील प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी मूळ जागी हजर होऊन काम करावे, असे आदेश बजावले. त्यानुसार सर्व विभागप्रमुखांनी नववर्षांच्या पहिल्याच दिवशी प्रतिनियुक्तीवर सोयीच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ ठिकाणी हजर होण्याचे आदेश काढले. कर्मचारी मूळ ठिकाणी हजर झाला नाही तर त्याचा पगार थांबवण्याचे आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचे बजावण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.