मराठी दिनाचे औचित्य साधून खडूशिल्पकार अशोक डोळसे यांनी मराठीचे वैभव असलेल्या नेवासे येथील ज्ञानेश्वरी मंदीरातील पैस खांब खडूमध्ये कोरून काढला आहे.
मराठी दिनानिमित्त उद्या (बुधवार) अनेकविध कार्यक्रम होत आहेत. त्यात डोळसे यांनी आपलाही सहभाग नोंदवला आहे. फक्त पैसचा खांब कोरूनच ते थांबले नाहीत तर त्या कोरलेल्या खांबावर त्यांनी संपुर्ण पसायदान ही कोरले आहे. हुबहूब असेच वर्णन करावे लागेल असे हे खडू शिल्प आहे.
काळ्या पाषाणाचा पोत त्यावर बरोबर उतरला आहे. सर्वात वरच्या बाजूला फक्त २ एमएम च्या वर्तुळात पादुका आहेत. खालच्या
बाजूला उलटय़ा पाकळ्यांचे वर्तुळाकारच कमलपुष्प आहेत. त्याखाली वर्तुळाकार वेढे असून त्यावर पसायदान कोरले आहे. पाहताक्षणीच दाद द्यावी असे हे शिल्प आहे.
सिताराम सारडा विद्यालयात कलाशिक्षक असलेले डोळसे गेली अनेक वर्षे खडू शिल्प तयार करत आहेत. सततच्या सरावाने त्यांनी त्यात विशेष कौशल्य मिळवले आहे. खडूवर व्यक्तीचित्र कोरण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.