रेल्वेचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या बदलीमुळे प्रवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बदलीचा विरोध करण्यासाठी घाटकोपरमध्ये महिलांनी मोर्चादेखील काढला होता.  दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील ३७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात रेल्वेचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांचाही समावेश होता. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आतच त्यांची बदली केली गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. सिंघल यांनी पदावर रुजू होताच अनेक चांगले उपक्रम राबविले होते. प्रवासी यांच्या हिताचे आणि सुरक्षेचे निर्णय घेत असल्याने कार्यकर्ते अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होते.
विविध विभागांना पत्र पाठवून त्यांनी सूचना केल्या होत्या. प्रवाशांच्या छोटय़ात छोटय़ा तक्रारींचा पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यात ते प्रयत्नशील होते. रेल्वेत त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले होते. त्यांच्या बदलीचे वृत्त समजताच घाटकोपरमध्ये रहिवाशांनी मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला होता. सोशल मीडियावरही त्यांच्या बदलीबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याबाबत मुख्यमंत्री आणि थेट राष्ट्रपतींकडे प्रवाशांनी निषेध नोंदविला आहे.