लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढत चालल्याचे आज मुंबईत झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. माजी आमदार राजीव राजळे, युवा नेते विक्रम पाचपुते, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, दादा कळमकर यांच्यासह माजी आमदार नरेंद्र घुले व माजी खासदार प्रसाद तनपुरे हेही इच्छुक आहेत. जिल्हय़ातील नेत्यांनी उमेदवारीबाबत एकवाक्यता दाखवावी, अशी समज देतानाच पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येत्या आठ-दहा दिवसांत उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल, असे सांगितले.
काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात जिल्हय़ातील लोकसभेच्या दोन जागांपैकी नगर दक्षिण मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला आहे. या जागेच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी तसेच इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी पवार यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयात सायंकाळी बैठक घेतली. पक्षाचे मंत्री व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह जिल्हय़ातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, निरीक्षक अंकुश काकडे, आ. बबनराव पाचपुते, आ. शंकरराव गडाख, आ. चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष शेलार, महापौर संग्राम जगताप, जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सभापती कैलास वाकचौरे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार राजीव राजळे, शंकरराव घुले, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या निमित्ताने प्रथमच माजी आमदार नरेंद्र घुले व माजी खासदार प्रसाद तनपुरे हेही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे प्रथमच स्पष्ट झाले. शेलार यांनीच कोण कोण इच्छुक आहेत, याची माहिती पवार यांना दिली. काकडे व राजळे यांनी जिल्हय़ातील परिस्थिती विशद केली. राजळे यांनी जिल्हय़ातील इच्छुक नेत्यांचे काम कसे चांगले आहे, याची माहिती देण्यास सुरुवात करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्हालाच उमेदवारी दिली तर, असा प्रश्न केला. त्यावर राजळे यांनी त्यांनी केलेल्या सव्र्हेची माहिती दिली.
तनपुरे यांनी पवार जो उमेदवार देतील तो आम्ही मान्य करू अशी ग्वाही दिली. प्रचारासाठी वेळ मिळावा यासाठी पक्षाने लवकर उमेदवारी जाहीर करावी, अशीही सूचना अनेकांनी केली. उमेदवारी लवकरच, येत्या आठ-दिवसांत जाहीर केली जाईल, मात्र उमेदवारीबाबत जिल्हय़ातील नेत्यांनी एकवाक्यता ठेवावी, असेही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितल्याचे समजले.