गेल्या आठवडय़ात पार पडलेल्या झेवियर्सच्या ‘मल्हार’ आणि एनएमच्या ‘उमंग’ने मुंबईतील आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांचे ‘ओपनिंग’ केले. मल्हार आणि उमंगच्या रंगात न्हाऊन निघाल्यानंतर आता तरूणाईचे लक्ष सप्टेंबरमध्ये रंगणाऱ्या पोद्दारच्या ‘एनिग्मा’ आणि सोफियाचा ‘कॅलिडोस्कोप’कडे लागले आहे. मुंबईतील या आणखी दोन मोठय़ा आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांचे काऊंटडाऊन सोशल मिडियावर सुरू झालेच आहे. ट्विटर, फेसबुक, ब्लॉग, युटय़ूब आदींच्या माध्यमातून होता येईल तेवढी उत्सुकता ताणविली जात आहे.
माटुंग्याच्या आर. ए. पोद्दार महाविद्यालयाच्या एनिग्माची यंदाची थीम लाईन असणार आहे ‘दि टाईम मशिन’.  ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात ‘सेट’ केलेल्या  टाईम मशीनचे ‘काऊंटडाऊन’ आता सुरू झाले आहे. एन्गिमाच्या नावात दडलेले गूढ, रहस्यमय असे काहीतरी या महोत्सवात असेल, असा दावा नित्य वर्मा या विद्यार्थ्यांने केला. एन्गिमच्या  http://www.podarenigma.com/   या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्पर्धाची माहिती घेता येईल. वातावरणनिर्मितीसाठी सोशल मिडियाचा होता होईल तितका फायदा आयोजक टीम घेताना दिसते आहे. एनिग्मासाठी तर काही उत्साही विद्यार्थ्यांनी ब्लॉग लिहिण्यास सुरूवात केली आहे.
आचार्य झाले आचारी
एनिग्मामध्ये ‘ॠतुरंग’अंतर्गत मराठी सांस्कृतिक महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यात स्वतंत्रपणे काही स्पर्धाचे आयोजिल्या जातात. यंदा यात शिक्षकांसाठी ‘आचार्य झाले आचारी’ ही धमाल स्पर्धा होणार आहे. बल्लवाचार्य झालेल्या शिक्षकांना आकर्षक पद्धतीने सॅलेड सजविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. याचबरोबरच कथाकथन, रांगोळी, पारंपारिक वेशभूषेत नाटय़ाभिनय, मुद्राविष्कार आदी कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धाचे आयोजन ॠतुरंगमध्ये करण्यात आले आहे. या शिवाय एनिग्मामध्ये नृत्य, संगीत, नाटय़, फाईन आर्ट, निबंध, क्रीडा आदी स्पर्धाही असणार आहेत.
सोशल मिडियावर कॅलिडोस्कोप
त्यानंतर लगेचच सुरू होईल तो भुलाबाई देसाई मार्गावरील सोफिया महाविद्यालयाचा ‘कॅलिडोस्कोप’. ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान पार पडणाऱ्या स्पर्धाच्या प्राथमिक फेऱ्यांमधून तरुणाईमध्ये जोश भरेल. प्रत्यक्ष महोत्सव ७ आणि ८ सप्टेंबरला रंगेल. या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाची यंदाची थीम असणार आहे, ‘आर वी देअर येट?’. आपली ही थीम सर्वत्र पोहोचविण्यासाठी कॅलिडोस्कोपच्या आयोजक विद्यार्थिनींच्या टीमने याआधीच ट्विटर, फेसबुक, युटय़ूब आदी सोशल मिडियाचा आधार घेत उत्सुकता ताणवली आहे. पर्यटन हा विषय केंद्रस्थानी ठेवून यंदाचा कॅलिडोस्कोप फिरणार असल्याचे कॅलिडोस्कोपसाठी जनसंपर्काची जबाबदारी पार पडणाऱ्या लुबना या विद्यार्थिनीने सांगितले.