अशोक सिरसाट हे ‘उधान’ या काव्यसंग्रहामुळे सर्वाच्या परिचयाचे आहेत. हा कवी सभोवतालचे वास्तव पाहतांना केविलवाणा व हताशही होतो. ग्रामीण वसाहतीपासून तर गजबजलेल्या कोलाहतीत शहरात वावरताना माणुसकी हद्दपार झाल्याचे कवीला जाणवते. आपली काव्यबीजे पेरून माणुसकी उगवण्याची कवी वाट पाहतो आहे. या माणुसकी पेरण्याच्या प्रयत्नातून बदल व्हावा, यासाठी कवी आग्रही भूमिका घेताना दिसून येतो.
जागोजागी माणुसकीचा खून करणाऱ्यांवर तो तुटून पडतो. पेरणी हा शब्द शेतीशी निगडित आहे. त्यातून तो नवनिर्माणाचे स्वप्न नुसतेच पहात नाही, तर ते साकारण्यासाठी हा शब्द मोठय़ा धाडसाने वापरतो. व्यवस्थेवर नांगर चालविण्याची परंपरा जपणाऱ्या, शिव्यांची लाखोळी व वाहणाऱ्या समकालीन कवितेची धार सौम्य झाली की काय, हा प्रश्न येथे पडतो. शिरसाट हे प्रामाणिकतेबरोबरच प्रांजळपणाही जपणारे आहेत. वेदना विद्रोहापेक्षा मानवी मूल्य व त्यातील माणुसकीचा गहिवरच येथे हिंमत दाखवतो ती स्वत:पासून बदल होण्यासाठी तळमळतो. तो मातीशी निगडित आहे. त्याच्याशी कधी बईमानी होत नाही. ही कष्टप्रद वाटचाल  महत्त्वाची वाटते. ती कविता एका चळवळ्या कवीची आहे, हे त्यांच्या दुबार पेरणी या शब्दातून प्रतीत होते. बाबासाहेबांना उद्देशून लिहिलेली धम्मरथ या कवितेत बाबासाहेबांच्या विचारांच्याच या देशातील माणसांनी चुराडा केल्याची खंत कवी व्यक्त करतो. माणसामाणसांचे रक्त एकच असूनही त्यात सावत्रपणा का रुजला? तो दलित साहित्यातही निर्माण झाला आहे. घरटय़ात रात्र मेली बचैन ही हवा. धरतीच्या बापराजा, तू जन्म घेना नवा, यासारख्या गुणगुणाव्या अशा रचना अंतर्मुख करतात. अशोक सिरसाट यांची गेय कविताही वैचारिक बांधिलकी जोपासणारी आहे. कामगार जीवनाचे चित्रण ती करते. लढाई हे गाव सारे धम्मिस्ट व्हावे, स्वातंत्र्याचं गाव, अस्मितेचा उजेड, पानगळ, घरकुल, एकोप्याचा डाव, दीपस्तंभ, शिवबा व दंगल, इत्यादी कवितांमधून वाचकांना नवआकलनाचे सर्जन बहाल होते. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतरची स्थिती व स्वार्थी भावना बदलण्यासाठी समाजमनाची मशागत करणारा हळव्या संवेदनशील जाणिवेच्या आविर्भावात कवी व्यक्त होताना जाणवतो. येथे कवी समूहनिष्ठेबरोबरच समग्र मानव समूहाची र्सवकष जाणीव कवी व्यक्त करताना दिसून येतो.
५९ कविता व ८० पृष्ठांचा ‘माणुसकीच्या दुबार पेरणीसाठी’ हा कवितासंग्रह आनंद प्रकाशन, औरंगाबाद यांनी प्रकाशित केला आहे. विलास अंभोरे यांची प्रस्तावना, तर सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ लाभलेल्या या कवितासंग्रहाची किंमत ६० रुपये आहे, वाचकांनी तो अवश्य वाचावा, असा हा कवितासंग्रह आहे.