वाघांच्या शिकार प्रकरणात सीबीआयने कुट्टू पारधी याला मध्यप्रदेशातील कटनी येथून केलेल्या अटकेनंतर, झुल्लु पारधी व बईनी पारधी यांच्या अटकेसाठी राज्य राखीव पोलिस दलाची ५० जवानांची तुकडी, आयपीएस अधिकारी, क्राईम ब्रान्च, तसेच दोन पोलिस निरीक्षक, सहा उपनिरीक्षक असा मोठा ताफा सीबीआयला वापरावा लागल्याचे आता समोर आले आहे.
वाघांच्या शिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातही, पण या शिकार प्रकरणाच्या तपासाचे गांभीर्य मात्र केवळ एकाच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासनाला असल्याचे गेल्या दोन वर्षांत स्पष्टपणे निदर्शनास आले. वनखाते या प्रकरणाचा छडा लावण्यात कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते सीबीआयकडे सोपवण्यात आले. मात्र, त्यानंतरही केवळ एकाच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचे या तपासात सहकार्य मिळत असल्याचे सीबीआयच्याच काही अधिकाऱ्यांनी नागपुरात स्पष्टपणे बोलून दाखवले होते. आताही या प्रकरणांचा छडा लावताना केवळ एकाच व्याघ्र प्रकल्प प्रशासनातील अधिकाऱ्यांची मदत सीबीआयला मिळत आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आठ दिवसात तीन आरोपींना अटक झाली आहे.
कुट्टू हा आंतरराष्ट्रीय तस्कर सर्जू आणि रासलाल यांचा सहकारी आहे. त्याला कटनी जिल्ह्यातील बिरुहल्लीच्या जंगलातून सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेतले. पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या शिकारीचे आरोप त्याच्यावर असल्याने पेंच व्याघ्र प्रकल्पातही त्याला अटकेनंतर नेण्यात आले. त्याच्याच सांगण्यावरून सहकारी झुल्लु आणि बईनी पारधी यांच्या अटकेचा डाव सीबीआयने रचला.
सीबीआयने छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील राज्य राखीव पोलिस दलाची तब्बल ५० जवानांची फौज वापरली. सोबतीला आयपीएस अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक यांनाही दिमतीला घेतले. सीबीआयने सोबतच्या अधिकाऱ्यांनाही अखेपर्यंत या मोहिमेची माहिती दिली नाही. राजनांदगावसमोर लिमो नावाच्या खेडय़ातून झुल्लु आणि बईनी पारधी यांना अटक करण्यात आली तेव्हा वाघाचे दात, नखे, अस्वलाची नखे, जाळे, शिकारीचे शस्त्र, असा मोठा साठाही त्यांच्या घरून जप्त करण्यात आला.
२० तारखेपर्यंत या दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

वनाधिकाऱ्यांमुळेच जामीन
गोंदिया जिल्ह्यात वाघांच्या शिकार प्रकरणात अलिकडेच एका आरोपीला अटक करण्यात आल्यावर आरोपपत्र दाखल करण्यास वनाधिकाऱ्यांनी केलेली दिरंगाई चर्चेचा विषय ठरली आहे. अटकेनंतर ६० दिवसात आरोपपत्र दाखल करावी लागते. या प्रकरणात मात्र ती न केल्याने आरोपींना जामीन मिळाला.