सोमय्या कॉलेजमध्ये चर्चासत्र संपन्न
सायबर गुन्ह्य़ांत होणारी वाढ रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा तत्पर आहे. पोलीस दलातील कर्मचारी सायबर क्षेत्रात कुशलता प्राप्त करून घेण्यासाठी सज्ज झाले असून भविष्यातील सायबर धोक्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास जिल्हा पोलिसांच्या सायबर सेलचे सहाय्यक निरीक्षक किरण बकाळे यांनी व्यक्त केला.
के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या ‘सायबर सिक्युरीटीज’ या विषयावरील एक दिवसीय चर्चासत्राचे उदघाटन बकाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांचेच बीजभाषण झाले. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे होते.  
इंटेलिजेंट कोशंट सिक्युरीटी सिस्टीमच्या वर्षां शिंदे यांनी यावेळी बोलताना काळाची गरज लक्षात घेता ‘सायबर सेफ सिटीजन’ तयार होणे आवश्यक असून भविष्यात याच क्षेत्रात लाखो नोकऱ्या उपलब्ध होतील. सायबर क्राईमची जागतिक आकडेवारी सांगून त्यांनी भारतातील तुलनात्मक स्थिती निदर्शनास आणून दिली. पोलीस दलावरील ताण लक्षात घेता सायबर क्षेत्रात करीयरची मोठी संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहमारे यांनी संगणक हाताळताना कळत, नकळत घडणाऱ्या गुन्ह्य़ांबद्दलची माहिती दिली. वाणिज्य विभागप्रमुख प्रा. संतोष पगारे यांनी चर्चासत्राची माहिती दिली. दुसऱ्या सत्रात मुस्तफा खंबाती यांनी भारतातील शैक्षणिक संस्थांनी सायबर सुरक्षेबाबत काय खबरदारी घेतली पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात उच्च न्यायालयातील वकिल संकेत कुलकर्णी यांचे ‘सायबर कायदा’ या विषयावर व्याख्यान झाले. चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. डी. पिंगळे यांनी ‘सायबर नेटीझन’ ही संकल्पना समजावून सांगितली. तज्ज्ञांनी सादर केलेल्या शोधनिबंधांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. चर्चासत्रात २२० जण सहभागी झाले होते. प्रास्ताविक प्रा. संजय अरगडे यांनी केले. प्रा. एस. के. बनसोडे व व्ही. सी. ठाणगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रविंद्र जाधव यांनी आभ्मानले.