छत्रपती शिवाजी शासकीय सर्वेापचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण केल्याच्या गुन्हय़ात अडकलेले पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्यासह तिघा पोलिसांना मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांनी अखेर सशर्त जामीन मंजूर केला. गेल्या १२ जानेवारीपासून हे तिघे जण न्यायालयीन कोठडीत होते.
गेल्या ३१ डिसेंबर रोजी पहाटे शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेवर उपचार होण्यासाठी मदत नाकारल्याच्या कारणावरून तेथील शल्यचिकित्सा विभागातील निवासी डॉ. प्रशांत पाटील यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर (४८) यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नितीन चौगुले (३७) व पोलीस नाईक कृष्णात सुरवसे (३७) या तिघा जणांनी मारहाण केली होती. हे प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले. मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यामुळे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेतला होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक वायकर व अन्य दोघे पोलीस स्वत:हून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या सोलापूर कार्यालयात हजर होऊन अटक  करून घेतली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असता मुख्य न्यायदंडाधिका-यांनी त्यांना जामीनही नाकारला होता. नंतर या तिघांना येत्या २७ जानेवारीपर्यंत वाढीव न्यायालयीन कोठडी मिळाली होती.
दरम्यान, पोलीस निरीक्षक वायकर व इतरांना जामीन मिळण्यासाठी पुन्हा अर्ज दाखल केला असता त्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी भोसले यांच्यासमोर सुनावणी होऊन प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर तसेच राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या सोलापूर कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी अर्जदार वायकर व इतरांतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे तर सरकारतर्फे अ‍ॅड. अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.