शहरातील १०० पोस्टमननी गणवेश न मिळाल्याने मंगळवारी बनियन व चड्डी एवढाच पेहराव करून पत्रांचे वितरण केले! वारंवार मागणी करूनही गणवेश मिळत नसल्याने हे आंदोलन करावे लागले असल्याचे डाक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहराच्या विविध भागांत पोस्ट कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधले.
शहराचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने पोस्टमनची संख्या मात्र खूपच कमी आहे. जालना व औरंगाबाद जिल्ह्य़ांत मिळून केवल १२५ पोस्टमन आहेत. एका पोस्टमनने किमान १५ किलोमीटर फिरून टपाल वाटावे, असे अपेक्षित आहे. शहराचा विस्तार पाहता किमान २०० पोस्टमनची गरज आहे. मात्र, कर्मचारी वाढविण्याकडे डाक खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप डाक कर्मचारी संघटनेचे देवेंद्र परदेशी यांनी केला.
दिवसभरातील टपाल त्याच दिवशी वितरीत केले जावे, असा अधिकाऱ्यांचा दुराग्रह आहे. वास्तविक, तीन पोस्टमनचे काम एकाच पोस्टमनवर पडत असल्यामुळे दररोज वितरण करण्यात अडचण असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. गेल्या ५ वर्षांपासून पोस्टमनना गणवेश दिले नाही. सरकारने कापड विकत घेऊन प्रत्येक गणवेशासाठी ९८ रुपये ५५ पैसे शिलाई दिली. मात्र, गणवेशच न दिल्याने पोस्टमन मंगळवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी बनियन आणि चड्डीवर टपाल वाटप केले.