जिनिंग व प्रेसिंग आवारातील कापूस गाठी व सरकीच्या लोडींग-अनलोिडगचे काम पूर्वीच्या प्रचलित दराप्रमाणे करण्याचे हमाल संघटनेने मान्य केल्यामुळे हमाल कामगार संघटना व कापूस खरेदीदार यांच्यात निर्माण झालेल्या वादावर मंगळवारी अखेर पडदा पडला. त्यामुळे उद्यापासून (बुधवार) परभणी बाजारपेठेत कापसाची खरेदी सुरू होणार आहे.
कापूस खरेदीदार व हमाल संघटना यांच्यात हमाली दरवाढीवरून वाद निर्माण झाला होता. हमालीचे दर वाढवले जावेत, अशी हमाल संघटनांची मागणी होती. दरवाढीबाबत कापूस खरेदीदारांनी असमर्थता दाखवली. परभणी बाजार समितीनेही यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे काल सोमवारीच मंगळवारपासून तात्पूर्ती कापूस खरेदी बंद राहील, असे बाजार समितीने जाहीर केले होते.  मंगळवारी पुन्हा हमाली दरवाढीवर सांगोपांग चर्चा झाली. हमाल संघटनेने पूर्वीच्याच दरावर काम करण्यास सहमती दर्शवली व दरवाढीबाबत ऑगस्टमध्ये निर्णय घेण्यात येईल, यावर एकमत झाले. बाजार समितीचे सभापती आमदार संजय जाधव, जिल्हा उपनिबंधक बडे, कामगार अधिकारी पोलीस निरीक्षक चापटे, कापूस खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कंदी, ओमप्रकाश डागा, कॉ. विलास बाबर, बाजार समितीचे संचालक व सचिव आदी या बैठकीस उपस्थित होते.