पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडण्यात अत्यंत महत्त्वाचा ठरलेला सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता प्रकल्प सुरू होऊन आता दोन महिने उलटत असले तरी या रस्त्यासाठी जागा दिल्याने प्रकल्पग्रस्त ठरलेल्या ६२ कुटुंबांचे पुनर्वसन अद्यापही झालेले नाही. त्यांच्या पर्यायी निवासासाठी भाडेशुल्क देण्यापायी मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने गेल्या तीन वर्षांत तीन कोटी ६० लाख रुपये खर्च केले आहेत.
कुर्ला पश्चिम येथील नेताजी नगर येथील ६२ कुटुंबांचे पुनर्वसन आता तीन वर्षे होत आली तरीही झालेले नाही. प्रकल्पासाठी त्यांना हलविताना वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत नगर येथे ४५० चौरस फुटांचे घर मिळेल, अशी हमी त्यांना देण्यात आली होती. पण ही सारी आश्वासने हवेत विरली. पुनर्वसन होईपर्यंत प्रत्येक कुटुंबाला पर्यायी निवासस्थानासाठी भाडेशुल्क म्हणून तीन वर्षांसाठी तीन लाख ९६ हजार रुपये, स्थलांतरासाठी ६६ हजार रुपये आणि अनामत रकमेसाठी एक लाख रुपये देण्यात आले. अशा रीतीने तीन वर्षांसाठी ६२ कुटुंबांवर भाडेशुल्कापोटी दोन कोटी ५३ लाख ४४ हजार रुपये, स्थलांतरासाठी ४२ लाख २४ हजार आणि अनामत रकमेपोटी ६२ लाख रुपये अशी एकूण तीन कोटी ५९ लाख ६८ हजार रुपये इतकी रक्कम खर्ची पडली, अशी माहिती अनिल गलगली यांच्या अर्जावर उत्तर देताना ‘एमएमआरडीए’ने दिली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या भाडेशुल्कावर कोटय़वधी रुपयांचा खर्च होत असताना पुनर्वसन मात्र सरकारी उदासीनतेमुळे रखडत आहे. याबाबत रहिवाशांनी आता सरकार दरबारी धाव घेतली आहे.