गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील एकसष्ठावा लेख.
तंटामुक्त गाव मोहीम म्हणजे केवळ तंटे मिटविण्याचे माध्यम नव्हे तर, ग्रामीण भागातील जनतेची मानसिकता बदलविण्याचे ते प्रभावी साधन ठरल्याची बाब नाशिक परिक्षेत्रात ठिकठिकाणी आयोजित होत असलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अधोरेखित झाली आहे.
सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन अन् गावातील अनिष्ट प्रथा रोखण्याचा जो उद्देश या मोहिमेत अनुस्युत आहे, तो हुंडा देण्या-घेण्याच्या रूढीला फाटा देत अत्यल्प खर्चात लग्नाची तयारी दर्शविणाऱ्या वधू-वरांनी साध्य केल्याचे  चित्र आशादायक आहे. लग्नाच्या बडेजावातून एखाद्या गरीब कुटुंबाची सुटका करण्यास सामूहिक विवाह सोहळा हा पर्याय ठरू लागल्याने लग्नामुळे कर्जबाजारी होण्याचे संकट टळत आहे. नाशिक विभागात आयोजित  सामूहिक विवाह सोहळ्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील सामाजिक सुरक्षिततेसाठी कार्यक्रम राबविण्याचा निकष पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. नाशिकसह मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पार पडणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये इच्छुक वधू-वरांच्या संख्येत  वाढ झाली आहे. ठिकठिकाणच्या या सोहळ्यांमध्ये साधारणत: २५ ते ५० जोडपी विवाहबद्ध झाली. अत्यल्प खर्चात विधिवत विवाह सोहळा होत असल्याने ग्रामस्थांचा या उपक्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे लक्षात येते.
वास्तविक लग्न सोहळ्यात केला जाणारा वारेमाप खर्च हा चिंतेचा विषय आहे.  लग्न म्हटले की, हुंडा, लग्नातील मानपानावर केला जाणारा खर्च आटोक्यात येत नाही. ग्रामीण भागात कित्येक शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नासाठी आपल्या जमिनी विकाव्या अथवा गहाण ठेवाव्या लागल्या आहेत. ग्रामस्थांची ही मानसिकता बदलविण्याचे कार्य तंटामुक्त गाव मोहिमेद्वारे दृष्टिपथास आले आहे. सामाजिक सुरक्षा निर्मितीसाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजनास स्वतंत्रपणे गुण दिले जातात. ही बाब लक्षात घेऊन या सोहळ्यांना चालना देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
माणूस बदलला तर गाव बदलेल
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील कामकाजावर ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’मधून ‘गाव तंटामुक्त सर्वागयुक्त’ या लेखमालेद्वारे प्रकाशझोत टाकला जात आहे. या मोहिमेची वाटचाल स्वागतार्ह आहे. परंतु, प्रत्यक्षात कृतिशील सत्यता किती आणि कागदोपत्री किती याचा शोध घेऊन बोध घेण्याची गरज आहे. ग्रामसभेचा कायदा झाला, पण बहुसंख्य ग्रामसभा कागदांवरच असल्याचे दिसून येते. ग्रामसभेत दबाव-प्रभाव तंत्राचा वापर असल्याने अनेकदा विषयानुसार कामकाज होत नाही, हे सर्वज्ञात आहे. तद्वतच तंटा हा सदाचाराच्या मार्गाने परस्परांना समजावून घेतले तरच संपुष्टात येईल. गावागावातील भाऊबंदकी, जमिनींचे वाद, व्यसनांचे तंटे, स्थानिक निवडणुकीतील गट-तट खूपच प्रखर असतात. ते मिटता मिटत नाहीत, ही वास्तवता कोणासही नाकारता येणार नाही. नशाबंदी तथा व्यसनमुक्ती हा विकासाचा पाया असल्याने त्यावर भर दिला पाहिजे. श्रमदानाने विकासाला चालना मिळते. त्यामुळे योजनेविषयी ग्रामस्थांमध्ये आपलेपणा निर्माण होतो. कुटुंब नियोजनामुळे कौटुंबिक समस्या व वाद वाढत नाहीत. राजकारणाला गावापासून दूर ठेवल्याशिवाय गाव सुधारणार नाही. गट-तट व वाद संपुष्टात आणण्याकरिता ग्रामपंचायती व सोसायटीच्या निवडणुका खेळीमेळीत अविरोध केल्या पाहिजेत. आज विकासाच्या संकल्पना बदलत आहेत. गावात उंच इमारती बांधणे आणि रंगरंगोटी करणे म्हणजे विकास समजला जातो, पण हा विकास नव्हे. माणूस बदलला तरच गाव बदलेल. तेव्हा तंटामुक्ती अभियानात यावर भर देण्याची गरज आहे.
पां. भा. करंजकर, नाशिक