डिझेल दरवाढीचे कारण देऊन कल्याण डोंबिवली पालिका परिवहन प्रशासनाने पुन्हा तिकिट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. वर्षभरातील ही दुसरी दरवाढ असणार आहे. किमान दोन रूपये तिकिट दरवाढीचा हा प्रस्ताव आहे. या भाडेवाढीत किमान भाडय़ाचे पाच रूपये तिकिट सात रूपये होणार आहे. दोन ते चार किमीसाठी सहा रूपयांऐवजी दहा रूपये होणार आहेत. पुढील प्रत्येक दोन किमीसाठी दोन रूपये भाडे आकारण्यात येणार आहे. या दरवाढीमुळे उपक्रमाला दैनंदिन पाच लाखाचा महसूल मिळणार असून वार्षिक सुमारे सहा ते सात कोटीपर्यंत महसुलात वाढ होणार आहे. यापूर्वीची तिकीट दरवाढ केल्यानंतर पुन्हा डिझेल दरवाढ झाली आहे. त्यामुळे बस परिचलनात उपक्रमाला ११ ते १२ रूपयांचा आर्थिक फटका बसत आहे. २२ टक्क्यांचा खर्च आता ३३ टक्क्यांवर पोहचला आहे, असे उपक्रमातील एका सुत्राने सांगितले. त्यामुळे तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही, असा दावा उपक्रमातील वरिष्ठ अधिकारी करत आहेत.