रामदासपेठ भागातील रुग्णालयात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याने राबविलेल्या धडक मोहिमेत मनपाने एका बोगस डॉक्टरला गजाआड केले असून सीताबर्डी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामदासपेठ येथील निकालस टॉवरमध्ये जगदंबा नावाने डॉ. सतेज राठोड या बोगस डॉक्टरचे क्लिनिक आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने धाड घालून येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याचे उघडकीला आणले. क्लिनिकच्या नावाखाली अनेक बोगस डॉक्टर वेश्या व्यवसाय करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 मनपाने बोगस डॉक्टरांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. मनपाला डॉ. सतेज राठोड हा बोगस डॉक्टर असल्याचा संशय होता. मनपाचे डॉ. मीनाक्षी सिंग, डॉ. विजय जोशी व डॉ. अतिक खान यांनी १० मे ला क्लिनिकमध्ये जाऊन कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यावेळी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीचे प्रमाणपत्र त्याच्याकडे नव्हते. आपल्याकडे प्रमाणपत्र असल्याचे मनपाच्या डॉक्टरांना सांगितले. आयुर्वेदिक पंचकर्माचे प्रमाणपत्र असल्याचे दाखविले, पण या प्रमाणपत्रावर वैद्यकीय व्यवसाय करता येत नसल्याने मंगळवारी त्याच्या विरोधात डॉ. मीनाक्षी सिंग यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.  आठ बोगस डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. राठोड यांच्या क्लिनिकमध्ये वेश्या व्यवसाय चालतात. आतापर्यंत सहा लोकांना गुन्हे शाखेने धाड घालून ताब्यात  घेतले होते. यात एक महिला, दोन पुरुष व आणि तीन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. अल्पवयीन मुलींना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या तीन जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.