न्यायालयात प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे झटपट निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात तीन मार्च रोजी महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून या संधीचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश सतीश हिवाळे यांनी केले आहे.
महा लोकअदालतीच्या नियोजनासाठी न्यायालयात बैठक झाली. या वेळी प्रामुख्याने दाखल खटल्यांचा निपटारा करण्याविषयी चर्चा झाली. महा लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी एक साधा अर्ज द्यावयाचा असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. वेळ व पैसा यांची बचत होऊन सामोपचाराने वाद मिटविणे हा प्रमुख उद्देश ठेवून या महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुष्काळाचे संकट पाहता बँकेच्या अधिकारी व कर्जदारांनी सामंजस्याने वाद मिठविण्यातच खरा शहाणपणा असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण आपणास सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही न्या. हिवाळे यांनी दिले.
बैठकीस सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमंत चक्कर, दुसरे सहन्यायाधीश महेश सोयनी, वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर. पी. सोनवणे, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद एरंडे, सचिव अ‍ॅड. चंद्रकांत माळी, सहसचिव अ‍ॅड. नुतन लोडाया, एमएसईबीचे ईश्वर पाटील, बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते. प्रास्तविक न्यायालयाचे वरिष्ठ लिपीक सुरेश ठाकूर यांनी केले. आभार अ‍ॅड. आर. पी. सोनवणे यांनी मानले.