काळाची गरज लक्षात घेऊन इतिहासाकडे शास्त्र म्हणून पाहणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी व्यक्त केले. ‘प्राचीन महाराष्ट्र परंपरा आणि समृद्धी’ या डॉ. प्रभाकर देव गौरव ग्रंथाच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पुणे येथील डेक्कन कॉलेज विद्यापीठाचे कुलपती डॉ. गो. बं. देगलूकर, गव्र्हनिंग कौन्सिल ऑफ इंटकचे सदस्य अशोकसिंह ठाकूर, उपमहापौर आनंद चव्हाण, प्रभाकर देव, प्रतिभा देव यांची उपस्थिती होती.
 इतिहासाकडे शास्त्र म्हणून पाहणे काळाची गरज असून ऐतिहासिक माहात्म्य आजच्या पिढीला कळले पाहिजे. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टी, अशी जर ओळख ठेवली, तर ते पूर्णत: चुकीचे ठरेल. प्रभाकर देव यांनी आपल्या जवळचे सर्व काही इतरांना देण्यातच धन्यता मानली असेही  पालकमंत्री म्हणाले.
प्रमुख अतिथी डॉ. गो. बं. देगलूकर यांनी डॉ. देव यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. देव माझे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांचा असा भव्यदिव्य सत्कार करण्याचे भाग्य गुरूला लाभणे मोठी गोष्ट असते. आतापर्यंत इतिहासाचे नुकसान करता येईल, तेवढे अनेकांनी केले आहे. पण डॉ. देव यांनी वास्तववादी इतिहास समाजासमोर ठेवला. इतिहासाबाबत त्यांनी जागृती केली हीच बाब कौतुकास्पद आहे.
सत्काराला उत्तर देताना डॉ. देव यांनी नांदेडला वस्तुसंग्रहालय व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. इतिहासाचे सर्वाधिक अवशेष मराठवाडय़ात आहेत. पैठण, तेर यांसारखी गावे दोन हजार वर्षांपूर्वी महानगरे होती. आपल्या देशाचा इतिहास पराजयाचा नाही तर तो संपन्न वाटचालीचा आलेख आहे. जिल्ह्य़ातील अवशेषांचे जतन करण्यासाठी वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी केली. या वेळी अशोकसिंह ठाकूर, पत्नी प्रतिभा देव, स्नुषा सविता देव यांचीही समायोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीनिवास पांडे यांनी केले. सूत्रसंचलन प्रकाश सेनगावकर यांनी केले.