लागोपाठ दोन्ही मुलीच झाल्याचा राग काढत तसेच व्यापार व शेतात विहीर खोदण्यासाठी माहेरातून एक लाखाची रक्कम घेऊन येत नाही म्हणून पत्नीचा अनन्वित छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल व्यापारी पतीला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे घडलेल्या या खटल्यात प्रसाद रमेश कथले (वय ३३) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दोषी धरले व त्यास शिक्षा ठोठावली. फिर्यादी शंकर शिवलिंग झाडबुके (रा. तांदूळवाडी, ता. माळशिरस) यांची मुलगी सुवर्णा हिचा विवाह आरोपी प्रसाद कथले याजबरोबर झाला होता. तिला पहिली मुलगी झाली. त्यामुळे सासरी तिचा जाचहाट सुरू झाला. तसेच माहेरातून व्यापारासाठी पैसे आणण्यासाठी तिच्यामागे लकडा लावण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या खेपेस पुन्हा मुलगीच जन्माला आल्याने पती प्रसाद याच्यासह सासरची मंडळींनी सुवर्णा हिच्यावर राग काढत तिचा छळ सुरूच ठेवला. मुलगा होत नाही, आमच्या वंशाला दिवा नाही म्हणून तिला घालून पाडून बोलण्यात येत असे. त्यामुळे वैतागून अखेर तिने बाळंतपणानंतर तिसऱ्या महिन्यातच घराजवळील विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी सुवर्णा हिचा पती प्रसाद याच्यासह सासू, सासरा, दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. डी. के. लांडे तर मूळ फिर्यादीतर्फे अॅड.जयदीप माने यांनी काम पाहिले. आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी बचाव केला. प्रसाद यास दोषी धरताना इतर तिघा आरोपींना निर्दोषमुक्त करण्यात आले. दोषी आरोपीने न्यायालयाकडे दयेची याचना केली. तेव्हा न्यायालयाने सध्या विवाहित महिलांचा छळ व आत्महत्यांच्या प्रकरणात वाढ होत असल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाल्याचे नमूद करीत आरोपीची विनंती फेटाळून त्यास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.