शैक्षणिक संस्थांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबद्दल आवड निर्माण करावी. विकसित संशोधनाचा लाभ समाजाला कसा मिळेल, यादृष्टीने शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची आवश्यकता असून ‘कौशल्यपूर्ण प्रशिक्षित भारत’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवापिढीनेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कामठी येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेठ केसरीमल पोरवाल शिक्षण संस्थेचा स्थापना दिवस तसेच कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे ऊर्जामंत्री तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एस.एच. देशपांडे, खासदार कृपाल तुमाने, खासदार नाना पटोले, आमदार मल्लिकार्जून रेड्डी, नानाभाऊ काशीकर संस्थेचे अध्यक्ष सुनील पोरवाल, सचिव विजय शर्मा, डॉ. एम.एन. घोषाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, नगरपरिषदेच्या अध्यक्षा रिजवाना कुरेशी, उपाध्यक्ष रणजित साफेलकर, प्राचार्य एस.एच. डोंगरे, राजू पोतदार व अशोक भाटिया प्रामुख्याने उपस्थित होते.
शैक्षणिक संस्थांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच रोजगार कसा मिळेल, यासारखे प्रश्न शिक्षण प्रणालीसमोर आहे. विद्यापीठ तसेच महाविद्यालयांनी मानांकन दर्जा मिळवित असतानाच शिक्षण, प्रशिक्षण व प्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये केवळ पुस्तकीज्ञान मिळते. पण प्रत्यक्ष कौशल्य मिळत नाही. यासाठी चांगली व्यवस्था निर्माण करण्याला प्राधान्य असून आपल्या ज्ञानाचा लाभ समाजाला कसा मिळेल, तसेच रोजगारक्षम युवापिढी निर्माण करण्याला प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कामठीसारख्या ग्रामीण भागात फुटबॉल या खेळात नैपुण्य मिळवून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण केले आहेत. या खेळाच्या विकासाबरोबरच इतर खेळांनाही प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलासारखी व्यवस्था निर्माण केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.
सेठ केसरीमल पोरवाल कॉलेजने ग्रामीण भागात उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधांसोबतच उत्कृष्ट खेळाडू निर्माण केले आहे. कामठी येथे क्रीडा संकुल तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी केले. कामठीला ‘अ’ दर्जाचे शहर बनविण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. नागपूर-कामठी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १८ कोटी तर याच मार्गाच्या चौपदरीकरणासाठी १७५ कोटी रुपयाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू प्रा. विजय देशपांडे, खासदार कृपाल तुमाने यांनीही त्यांचे विचार मांडले. महाविद्यालयातून प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.