सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश जिल्हाध्यक्षांनी देऊनही दोन महिला सभापतींसह उपाध्यक्षांनी पदत्यागास विलंब लावला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असून जयंत पाटील गटाच्या दोन सभापतींनी राजीनामा दिला आहे. मात्र गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गटाच्या महिला सभापतींनी राजीनामा देण्यास विलंब केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची बठक घेऊन राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. २८ ऑगस्ट रोजी या संदर्भात श्री. िशदे यांनी बठक घेऊन पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, कृषी सभापती आप्पासाहेब हुळ्ळे आणि बांधकाम सभापती देवराज पाटील यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे सोपविले.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने जनसुराज्य पक्षाशी युती केली असून या युतीनुसार उपाध्यक्षपद जनसुराज्यचे बसवराज पाटील यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा आदेश न मानता त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा अद्याप आलेला नाही. त्यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी जतचे नेते विलासराव जगताप यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
तथापि महिला व बालकल्याण सभापती राधाबाई हाक्के आणि समाजकल्याण सभापती छायाताई खरमाटे यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. दोघीही महिला पदाधिकारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गटाच्या मानल्या जातात. दोघींचे जिल्हा परिषद मतदार गट हे आर. आर. पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आहेत. जिल्हाध्यक्षांनी राजीनामा द्यायचे आदेश दिले असले तरी आपण गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे दोघींनी सांगितले आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेची २० सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली असून या सभेनंतरच पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम हालचाली होण्याची शक्यता आहे.