मुंबई सेंट्रल ते बोरिवली यादरम्यानच्या सहाव्या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी विलेपार्ले आणि मालाड येथील मार्गाशेजारीच असलेल्या रेल्वे वसाहतींवरच हातोडा पडणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई उपनगरी वाहतूक प्रकल्प दोन अंतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग टाकण्यात येणार आहे. यापैकी वांद्रे ते बोरिवलीदरम्यान पहिल्या टप्प्याचे (पाचवा मार्ग टाकण्याचे) काम सुरू असून येत्या दोन-तीन वर्षांत ते पूर्ण होईल. वांद्रे ते सांताक्रूझदरम्यान पाचवा मार्ग टाकण्याचे काम २००५ मध्ये पूर्ण झाल्याचे, रेल्वेसूत्रांनी सांगितले. आता सहावा मार्ग टाकण्याचे काम हाती घेण्यात येत असून ५२२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला सध्या अडथळा आहे तो विलेपार्ले आणि मालाड येथील रेल्वे वसाहतींचा. प्रत्येक ठिकाणी किमान पाच इमारती या मार्गाच्या आड येत असून, त्या पाडण्याशिवाय पर्याय नसल्याचे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात रेल्वे कामगार संघटनांशी चर्चा करण्यात आली असून लवकरच त्या इमारतींमधील कुटुंबांना अन्यत्र हलविण्यात येणार आहे. काही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या परीक्षा असल्याने परीक्षा संपल्यावरच त्यांचे स्थलांतरण करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले.
रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी रेल्वेमार्गाशेजारी जागाच शिल्लक नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली असली तरी रेल्वे प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना त्याच परिसरामध्ये जागा उपलब्ध करून द्यावी, असे काही रेल्वे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर या कर्मचाऱ्यांचे स्थलांतरण हे रेल्वे वसाहतींमध्येच करण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.