News Flash

..थेंबे थेंबे तळे साचे

पावसाचा दमदारपणा शहरात अद्याप अनुभविण्यास मिळाला नसला तरी पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे काही धरणांच्या जलसाठय़ात गतवर्षीच्या तुलनेत चांगली वाढ होत आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस जिल्ह्यातील मोठय़ा

| June 28, 2013 01:00 am

पावसाचा दमदारपणा शहरात अद्याप अनुभविण्यास मिळाला नसला तरी पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे काही धरणांच्या जलसाठय़ात गतवर्षीच्या तुलनेत चांगली वाढ होत आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस जिल्ह्यातील मोठय़ा व मध्यम धरणांमध्ये २.८९ टक्के असणारा जलसाठा यंदा १०.५६ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १३८५ दशलक्ष घनफूट जलसाठा असून गतवर्षी हेच प्रमाण निम्मे होते. पाणलोट क्षेत्रात पावसाचे अस्तित्व कायम राहिल्यास नेहमीच्या तुलनेत यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता आहे.
नाशिक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत चार मध्यम तर ४४ लघू प्रकल्प असून मालेगाव पाटबंधारे विभागात हे प्रमाण ३ मध्यम तर ३७ लघू प्रकल्प असे आहे. यंदा पावसाचे वेळेवर आगमन झाल्यामुळे काहिशी समाधानकारक स्थिती आहे. शहरात पहिल्या दणक्याचा अपवाद सोडल्यास पावसाचे स्वरूप रिमझिम राहिले. दुसरीकडे पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने काही धरणांची पातळी उंचावत आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील मध्यम प्रकल्पांत यंदाचा व गतवर्षीचा जलसाठा लक्षात घेतल्यास ही बाब सहजपणे लक्षात येते. शहराला पाणी पुरवठा करण्याची भिस्त गंगापूर धरणावर आहे. या धरणात सध्या १३८५ दशलक्ष घनफूट जलसाठा असून गतवर्षी हेच प्रमाण ६७३ इतके होते. यावरून या एकाच धरणातील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट असल्याचे लक्षात येते. इतर धरणांची स्थिती फारशी वेगळी नाही. दारणा धरणात यंदा
१२०७ दशलक्ष घनफूट (गतवर्षी २५५), मुकणे ५९ (०), भावली ३९७ (१३१), पालखेड ८४ (०), करंजवण ५६९ (१२), वाघाड ५९ (२१), ओझरखेड ८२ (०), चणकापूर १५७ (४) दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. पुणेगाव, तिसगाव व कडवा धरणात अद्याप जलसाठा झालेला नाही. गतवर्षी जूनच्या अखेरीपर्यंत कडवा, मुकणे, पालखेड, ओझरखेड, तिसगाव, ही पाच धरणे पूर्णपणे कोरडीठाक होती. २००८ ते २०१० या तीन वर्षांत जूनच्या अखेरीस जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदापेक्षा अधिक समाधानकारक जलसाठा होता.
नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांची एकूण क्षमता ३७,८६५ दशलक्ष घनफूट असून सध्याच्या उपयुक्त साठा ३९९८ दशलक्ष घनफूट इतका आहे. गतवर्षी हेच प्रमाण केवळ १०९५ दशलक्ष घनफूट इतके होते. चार मध्यम प्रकल्पांमध्ये २.०६ टक्के तर  ४४ लघु प्रकल्पांमध्ये १२.१० टक्के जलसाठा असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाने दिली आहे. मालेगाव पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या तीन मध्यम प्रकल्पात १.३४ टक्के तर ३७ लघु प्रकल्पात ३.६० टक्के जलसाठा आहे.
जिल्ह्यत आतापर्यंत ३२५०.७ मिलीमीटर पाऊस
मागील चोवीस तासात जिल्ह्यात ४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३२५०.७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस (६३२) इगतपुरी तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस (१११.३) येवला तालुक्यात झाला. नाशिक तालुक्यात आतापर्यंत १५०.२, दिंडोरी २१०, पेठ २८३, त्र्यंबकेश्वर ३३६, मालेगाव २०९, नांदगाव १४९.९, चांदवड १३४.५, कळवण १७५.२, बागलाण १८९.८, सुरगाणा २६०, देवळा १४३.८, निफाड ११३, सिन्नर १५३, येवला तालुक्यात १११.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा टंचाई शाखेकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2013 1:00 am

Web Title: rain continues at basin of dams
Next Stories
1 लष्करी भागातील १२० वृक्षांवर आता कुऱ्हाड
2 जमीन वाटपासाठी निदर्शने
3 प्रलंबित मागण्यांसाठी सुरक्षा रक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा
Just Now!
X