भारतीय माजी सैनिक संघ या संघटनेच्या वतीने वीरचक्रप्राप्त सैनिक, शहिदांच्या पत्नी व माता-पित्यांचा जाहीर सत्कार तसेच नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्य़ातील माजी सैनिकांचा मेळावा रविवारी सकाळी नऊ वाजता येथील कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यात माजी सैनिकांच्या विविध समस्यांवर चर्चा व मार्गदर्शन, त्यांच्यासाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती, माजी सैनिकांना सर्वत्र सौजन्याची वागणूक मिळावी, संपूर्ण महाराष्ट्रात घरपट्टी व महामार्गावर टोल माफी मिळावी, सरकारी आदेशांप्रमाणे शासकीय नोकरीमध्ये असलेल्या १५ टक्के आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, शांतीकाळात शहीद झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेणे, पालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माजी सैनिकांना नोकरीत प्राधान्य, कॅन्टीनची सुविधा प्रत्येक तालुका स्तरापर्यंत उपलब्ध व्हावी, समस्यांच्या समाधानासाठी प्रकर्षांने प्रयत्नरत असलेल्या संघटनेसाठी कार्यालय उपलब्ध होणे, बेघर माजी सैनिकांना घरकुल उपलब्ध करून देणे यांसह इतर समस्यांवर चर्चा होणार आहे. मेळाव्यास पालकमंत्री छगन भुजबळ, संघाचे राज्य उपाध्यक्ष पिटर डांटस आपल्या संपूर्ण कार्यकारिणी आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसह राज्याचे सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर, जिल्हाधिकारी विलास पाटील, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ आदी उपस्थित राहणार आहेत.