महापालिकेच्या निवडणुकीतील शिवसेनेचे पराभूत उमेदवार विक्रम अनिल राठोड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजयी उमेदवार किशोर डागवाले यांच्या निवडीस आव्हान देणारी याचिका दाखल करून घ्यायची की नाही यावर आता १५ मार्चला सुनावणी होणार आहे. दरम्यान या दाव्याच्या सुनावणीत आज डागवाले, महापालिका व आणखी एक पराभूत उमेदवार इमाम शफी अहमत शेख न्यायालयापुढे हजर झाले.
प्रधान दिवाणी न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्यापुढे ही सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत डागवाले यांचे वकील गणेश लेंडकर यांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली. महापालिकेचे वकील मंगेश दिवाणे यांनी उशिरा माफीचा अर्ज दाखल करून घेण्यास विरोध दर्शवला तर शेख यांचे वकील एस. आर. सय्यद यांनीही विरोध केला, मात्र दाखल करून घेतल्यास कॉस्ट आकारण्याची मागणी केली. आणखी एक पराभूत उमेदवार रविकांत आष्टेकर मात्र अनुपस्थित होते.
शहरातील प्रभाग २१-अ मध्ये झालेली, शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम व डागवाले यांच्यातील लढत जिल्ह्य़ात गाजली होती, त्यात राठोड यांचा पराभव झाला. त्यास आव्हान देणारी याचिका, विहित मुदत उलटून गेल्याने, झालेला विलंब माफ करण्याच्या अर्जासह दाखल करण्यात आली आहे. या अर्जावर न्यायालयाने सर्व प्रतिवादींना आज म्हणणे सादर करण्यास सांगितले होते.
राठोड यांच्या वतीने वकील सतीश गुगळे काम पाहात आहेत, त्यांना वकील महेश देवणे, हेमंत गवळी साहाय्य करत आहेत.