लहानपणापासून टीव्हीवर ‘आय लव्ह यू रसना’, ‘अमूल’ यासारख्या अनेक जाहिराती पाहणं हा त्याचा आवडता छंद होता. उदय नेनेने आज जाहिरात क्षेत्रात स्वतचे नाव सिद्ध केले आहे. ‘सेंटरफ्रेश ओशन’च्या जाहिरातीमधील मुलीच्या अंगावर कुत्र्याच्या आवाजात भुंकणारा चेहरा अल्पावधीत सर्वाच्या परिचयाचा झाला. लहानपणी जाहिरात क्षेत्राविषयी प्रचंड कुतूहल असलेला उदय आज चहीता मॉडेल बनला आहे.
जाहिरात माध्यमाचा प्रभाव हा काही वेगळाच आहे. बाहेरून दिसताना हे माध्यम खूप सहजसुंदर दिसतं. पण, या क्षेत्रात आल्यावर एका जाहिरातीमागे किती कष्ट घ्यावे लागतात हे कळते. मी पाच वर्षे एका नामांकित बँकेत नोकरी के ली आणि मग अगदी ठरवूनत या क्षेत्रात आलो. सुरुवातीला मला ‘टाटा इंडिकॉम’ची जाहिरात मिळाली. नामांकित ब्रँडची जाहिरात मिळणं हे सुरुवातीला खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर मात्र म्हणावा तसा ब्रेक मिळत नव्हता. काही कामानिमित्त गावी जाण्याचं ठरवलं. गावी जाणार त्याच दिवशी मला ऑडिशनला बोलावणं आलं. इतके दिवस ऑडिशनला जाऊन काय झालंय, ते आता होणार? पण, नंतर विचार बदलला आणि मी ऑडिशनला गेलो. गावी गेल्यावर त्या दिग्दर्शकाचा फोन आला की, तुझी मिशी असलेली ऑडिशन हवी आहे. काही झालं तरी ती ऑडिशन व्हायलाच हवी. शेवटी गावात एकाकडून नाटकात काढतात तशी मिशी काढून घेतली. मोबाइलवर ती ऑडिशन शूट केली. गावाबाहेर २५ कि.मी. अंतरावरचा सायबर कॅफे शोधून काढला आणि जवळपास सात तास तिथे बसून मी ते शूट पाठवलं. त्यानंतर मला ‘मेंटोफ्रेश’ची जाहिरात मिळाली होती. एक ऑडिशन तुमचं नशीब बदलवू शकते हे मी नुसतं ऐकलं होतं, माझ्याबाबतीत ते खरं ठरलं. या क्षेत्रात काम मिळणं हे नशीबावर अवलंबून आहे. काही वेळा असे योग जुळून येतात की तुम्हाला अगदी अचानक कामं मिळतात. काही वेळा सर्व उत्तम सुरू असतं. पण अगदी शेवटच्या सेकंदाला ठरलेलं फिस्कटतं. पण, हा सर्व व्यवसायाचा भाग आहे. याकडे दुर्लक्ष करुन प्रामाणिकपणे काम करीत राहिल्यावर यश नक्कीच मिळतं. ‘अपनें पे भरोसा हे तो एक डाव लगा लेंगे’ या तत्त्वावर मी कायम राहिलो आहे. आत्मविश्वास असला की अनेक गोष्टी सोप्या होतात.  जाहिरातीमध्ये कमी वेळात खूप काही सांगायचं असतं, व्यक्त करायचं असतं. काही वेळा पंचलाईन जाहिरातीला प्रसिद्धीच्या शिखरावर घेऊन जाते. माझी कंजुष फ्रेंडची जाहिरात खूप गाजली. त्याची टॅगलाइन होती ‘मिस्ड कॉल दिया हैं, वह कॉल करेंगे..’ या जाहिरातीमुळे मला अनेक जणओळखू लागले. एकदा मी ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी गेलो होतो. तिकीट देणाऱ्याने ते हातात ठेवले आणि ही पंचलाईन मला ऐकवली. महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये ‘आधी पैसे द्या मग जेवा..’ असा टोला मारुन या जाहिरातीची आठवण करुन दिली होती. या जाहिरातीच्या पंचलाईनने असे अनेक अनुभव मला दिले.     शब्दांकन- प्रभा कुडके
उदयचा सल्ला
जाहिरात क्षेत्रात प्रवेश मिळणं थोडं कठीण आहे, कारण सतत ऑडिशन्स देणं ही एक प्रक्रिया आहे. एक मात्र करा, एखादी जाहिरात मिळाली की लगेच क्षेत्र सोडू नका. या पिचवर टिकून राहा, भले रन्स हळूहळू काढा. तुम्ही या क्षेत्रात किती काळ आहात यापेक्षा या क्षेत्रातून काय शिकायला मिळेल याकडे लक्ष द्या. इथे अत्यूच्च दर्जाचं काम सुरू असतं. त्याचे निरीक्षण करा.
उदयच्या गाजलेल्या जाहिराती
सेंटरफ्रेश ओशन, मिंटोफ्रेश, सीएट टायर्स, युनिनॉर, मारूती सुझुकी, टाटा इंडिकॉम, एअरटेल