नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तनाची लाट आली, मात्र स्थानिक पातळीवरील नेतृत्व बदलले असले तरी वर्चस्व मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर गडाख यांच्याच गटाचे राहिले. गावपातळीवरील गडाख यांची पकड मजबूत असल्याचे निकालाने स्पष्ट झाले. २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्ताबदल होऊनही त्यांचेच वर्चस्व दिसून आले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या शिरसगाव तसेच खेडलेकाजळी, खामगाव व शिरेगाव या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. मतदान झालेल्या १८ पैकी घोडेगाव, वडुले, महालक्ष्मीहिवरे, गोगलगाव या गावच्या निवडणुकांकडे तालुक्याचे व श्रेष्ठीचे लक्ष होते. सर्वात मोठी असलेली घोडेगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त चुरस होती. या ठिकाणी काटय़ाच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीला १० तर विरोधी देसर्डा गटाने ७ जागेवर विजय मिळविला. राजेगाव ग्रामपंचायतीमध्ये लक्ष्मण घुले गटाला ५ जागा मिळवून विजय मिळविला. लोहारवाडीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये सत्ताबदल झाला. महालक्ष्मीहिवरेमध्ये बाजार समितीचे माजी सभापती भगवान गंगावणे यांच्या गटाचा पराभव झाला.
पाथरवाला ग्रामपंचायतीत युवकांनी स्थापन केलेल्या मंडळाने बाजी मारत ६ जागा जिंकल्या. दत्तात्रय खाटीक  यांना ३ जागा मिळाल्या. नांदूरशिकारी या ठिकाणी सत्ताबद्दल होऊन शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे सत्ता आली. चिलेखनवाडीत सत्ताबद्दल झाला. राष्ट्रवादीचे संजय सांवत यांचे ९ तर तुकाराम गुंजाळ यांच्या २ जागा आल्या. बेलपांढरी येथेही साहेबराव गारुळे यांच्या ७ पैकी ७ जागा आल्या. लेकुरवाळी आखाडा येथे राष्ट्रवादीचे विठ्ठल ससे यांच्या ५ तर पोपट शेंडगे यांच्या २ जागा आल्या.
जायगुडे आखाडा येथे युवक राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब गंडाळ यांनी ९ जागेवर विजय मिळविला. तर गोरख कोतकर यांच्या गटाचा पराभव झाला. तामसवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्ताबदल होऊन बाबासाहेब जगताप यांना ८ तर रमेश कोलते केवळ २ जागा आल्या. गोमळवाडी ग्रामपंचायतीतही सत्ताबदल झाला. या ठिकाणी डॉ. गणेश आडसुळे यांचे मंडळ निवडून आले.
वडुलेत भाजपची हॅटट्रिक
भाजपचे तालुकाध्यक्ष व आदर्श गाव पुरस्कार मिळवलेले सरपंच दिनकर गर्जे यांनी सलग तिस-यांदा वडुले गावात भाजपचा झेंडा फडकवला. या ठिकाणी राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.