विकासकामांऐवजी महापालिकेचा पत्त्यांचा अड्डा करणा-यांच्या आणि शंभर वर्षांची परंपरा असलेली अर्बन बँक बुडवणा-यांच्या हाती सत्ता देऊन नगर शहराची आणखी धूळधाण करणार का, असा प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री मधुकर पिचड यांनी कोणाच्या दादागिरीला न घाबरता नगरकरांनी शहराच्या विकासासाठी काँग्रेस आघाडीला विजयी करण्याचे अावाहन केले.
महापालिका निवडणुकीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ रविवारी सकाळी, शहराचे ग्रामदैवत माळीवाडा विशाल गणेश मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला, त्यानंतर माळीवाडा वेशीजवळ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे तसेच दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास व बाजार समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून पदयात्रा काढली.
शहर विकासासाठी परिवर्तन आवश्यक आहे, असे अावाहन करून पालकमंत्री पिचड यांनी महापालिकेची सत्ता काँग्रेस आघाडीच्या ताब्यात दिल्यास आम्ही तिन्ही मंत्री एकदिलाने शहर विकासासाठी प्रयत्न करू, असे अाश्वासनही दिले. महसूलमंत्री थोरात म्हणाले, गेल्या २५ वर्षांत शहरात कोणताही बदल घडवण्याचा प्रयत्न झाला नाही, केवळ भांडणे लावण्याचे प्रयत्न झाले, संदीप कोतकर व संग्राम जगताप यांच्या काळात मंजूर झालेल्या विकासनिधीतील कामेही सेना-भाजपला मार्गी लावता आली नाहीत, त्यामुळे पुढील पाच वर्षांत शहर प्रगती करणार की नाही, शहराची दुरवस्था दूर होणार की नाही, याच्या उत्तरासाठी मनपामध्ये आघाडीचा महापौर नगरकरांनी द्यावा.
संरक्षणाच्या नावाखाली शहरात गुंडगिरी सुरू असल्याचा, मनपात भ्रष्टाचार व देण्या-घेण्याचे व्यवहार होत असल्याचा आरोप माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी केला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा यांनी ‘भ्रष्टाचारमुक्त व विकासयुक्त महापालिका’चा नारा दिला. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी महापौर संग्राम जगताप यांनी प्रास्ताविक केले. आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, शारदा लगड, सविता मोरे आदींची भाषणे झाली. आ. अरुण जगताप, आ. भाऊसाहेब कांबळे, जयंत ससाणे, विनायक देशमुख, घनश्याम शेलार आदींसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आमदाराच्या भानगडीची यादी आपल्याकडे-विखे
गेल्या २५ वर्षांत शहरात आमदाराने केलेले विकासकाम दाखवा आणि १ हजार रुपये बक्षीस मिळवा, असे जाहीर आव्हान देतानाच कृषिमंत्री विखे यांनी आमदाराच्या भानगडींची यादीच आपल्याकडे असल्याचे सांगितले. युतीकडे सत्ता असूनही त्यांना सर्व प्रभागांत उमेदवार उभे करता आले नाही, महापालिकेतील पैशाचे वाटप त्यांच्यात व्यवस्थित झाले नाही हेच कारण त्यामागे आहे, असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची युतीमुळे दुरवस्था झाली, या पुतळ्यावरील धूळही पुसली जात नाही. विकासकामांऐवजी केवळ निवडणुका आल्या की जातीय दंगली घडवल्या जातात. शहरात खंडणी बहाद्दरांच्या टोळ्याच निर्माण झाल्या आहेत, यापासून शहराला वाचवायचे असेल तर आघाडी शिवाय पर्याय नाही, असे विखे म्हणाले.