१९३८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी ७५ वर्षांपूर्वी शहरातील ज्या ठिकाणी आवाज उठविला. त्या जागेवर भव्य क्रांतिस्तंभ उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही राष्ट्रीय मागासवर्गीय कर्मचारी परिषदेसाठी येथे उपस्थित मान्यवरांनी दिली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे मैदानात राष्ट्रीय मागासवर्गीय कर्मचारी परिषद देशभरातील शेकडो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झाली, या परिषदेला आ. पंकज भुजबळ, ऑल इंडिया एससी-एसटी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्षांसह रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, प्रा. जोगेंद्र कवाडे, मनोज संसारे, शकुंतला वाव्हळ आदींनी मार्गदर्शन केले. ऑल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन आणि राष्ट्रीय मागासवर्गीय कामगार परिषदेने या कार्यक्रमाचे संयोजन केले. स्वागताध्यक्ष राजाभाऊ पगारे यांनी उपस्थितांचा सत्कार केला. सूत्रसंचालन ऑल इंडिया एससी-एसटी असोसिएशनचे सतीश केदारे यांनी केले. तत्पूर्वी सकाळी शहरातून कामगारांची शोभायात्रा काढण्यात आली. परिषदेनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दिशा व दशा, पदोन्नतीते आरक्षणाची तरतूद का ? तसेच खासगीकरण, उदारीकरण आणि संघटीत असंघटीत कर्मचारी यांच्यातील संघष, डॉ. आंबेडकरांच्या विचारधारेप्रमाणे कर्मचारी संघटनांचे केंद्रीयकरण का आवश्यक आहे या विषयांवर परिसंवाद झाले.