दुष्काळाचे सावट बाजूला करून लोकांनी दिवाळीच्या आनंदोत्सवास सुरुवात केल्याने नगरच्या बाजारपेठेत चांगलीच गर्दी फुलली आहे. नोकरदारांना सलग पाच दिवसांची सुट्टी मिळाल्याने उत्सवी वातावरण आहे. आज दिवसभर रस्ते तुडूंब भरून वाहत होते. नागरिकांच्या गर्दीने शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. सर्वच प्रकारच्या वस्तूंच्या दरात १५ ते २० टक्क्य़ांनी वाढ झाली असली तरी सणापुरती महागाईची चिंता करणे लोकांनी सोडून दिल्याचे दिसते.
खरेदीत कापड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दागिने यांना प्राधान्य आहे. वाहन खरेदीचा वेग टिकून असला तरी जुन्या वाहनांनाही चांगला भाव मिळतो आहे. गृह खरेदीसाठी मात्र लोकांनी काहीसा हात आखडता घेतला आहे. ‘मोबाईल मार्केट’ला चांगला उठाव आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूत लॅपटॉप, टॅब, आयपॅड यांना मागणी आहे. कापड खरेदीत तरुणाई केवळ ‘रेडिमेड’ला पसंती देत आहे. मिठाईचा ग्राहक ड्रायफ्रुटकडे वळला आहे. ‘गिफ्ट’साठी त्याचा अधिक वापर होत आहे. चांदीच्या नाण्यांचा पर्यायही लोकांनी स्वीकारला आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे सायकलच्या खरेदीतही काहीशी वाढ झाली आहे. गेली काही वर्षे व्यावसायिकांनी खेरदीवर आकर्षक भेटवस्तू, लकी ड्रॉ, सवलती अशा काही योजना राबवल्या होत्या. त्याचा मात्र यंदा अभाव आहे.
राष्ट्रीयीकृत व नागरी सहकारी बँकाही केवळ आज खुल्या आहेत. शनिवार व रविवारची सुट्टी, नंतर मंगळवार, बुधवारची सुट्टी. त्यामुळे बँकांमध्ये आज ग्राहकांची झुंबड होती. अनेकांनी, उद्याच्या लक्ष्मीपूजनासाठी कोऱ्या नोटांच्या बंडलांची मागणी केली. बँकांच्या एटीएमसमोरही रांगा होत्या.
खरेदीच्या उधाणामुळे रस्त्यांवर अलोट गर्दी होती. प्रमुख बाजारपेठा शहराच्या मध्यवर्ती भागातच एकवटल्या असल्याने गर्दीमुळे सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीच्या कोंडीचा अनुभव होता. हातगाडीवरील विक्रेते व पथारीवाले यांनी रस्ते अडवले आहेत. बाजारसमिती चौक, माळीवाडा, लक्ष्मीकारंजा, चितळेरस्ता, कापडबाजार, गंजबाजार, सराफबाजार, सर्जेपुरा, दिल्लीगेट, चौपाटी कारंजा, अर्बन बँक रस्ता याठिकाणी कोंडी होती. मोठी अवजड व चारचाकी वाहने बिनदिक्कतपणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर आणली जात होती, पोलीसही त्यास प्रतिबंध करत नव्हते.