संचखंड एक्स्प्रेसने औरंगाबादला निघालेल्या दिल्ली येथील ‘आयटी’ कंपनीच्या व्यवस्थापकाला बिस्किटातून गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील सुमारे दोन लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरटय़ाने लंपास केल्यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीच्या अवस्थेत नांदेडला पोहोचलेल्या प्रवाशावर दहा दिवस वैद्यकीय उपचार झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
१२७१६ अप अमृतसर-नांदेड संचखंड एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. बेंजामिन सोलोमन सोनस हे या गाडीच्या एस- ९ या बोगीतून नवी दिल्ली ते औरंगाबाद असा प्रवास करत होते. याच बोगीत त्यांच्याजवळ बसलेल्या अज्ञात व्यक्तीने दिल्लीहून गाडी सुटल्यानंतर त्यांना पिण्याचे पाणी घेण्याचा आग्रह केला. मात्र, बेंजामिन यांनी टाळले. रात्रभराच्या प्रवासानंतर सकाळी पुन्हा त्याच व्यक्तीने बेंजामिन यांना चहासोबत बिस्कीट घेण्याचा आग्रह केला. या वेळी त्या व्यक्तीने बिस्किटचा पुडा उघडून एक बिस्कीट स्वत: खाल्ले व दुसरे बिस्कीट आग्रह करून बेंजामिन यांना दिले. ते खाल्ल्यानंतर काही वेळाने ते गुंगी येऊन बेशुद्ध झाले. याच संधीचा फायदा घेऊन त्या व्यक्तीने बेंजामिन यांच्या बॅगेतील दोन टॅब्लॉइड पीसी, एक लॅपटॉप, एक कॅमेरा व इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एक लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.  जवळपास १० दिवस गुंगीतील बेंजामिन यांच्यावर उपचार सुरू होते.   याबाबत त्यांनी नांदेड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन तो मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. चोरटय़ाच्या शोधासाठी विविध भागांत तपासपथके पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.