चिखलीच्या सिंधी कॉलनीतील अडते शीतलचंद दीपचंद गुरुदासाणी यांच्या घरी मंगळवारी मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा घातला. घरातील व्यक्तींनी दरोडेखोरांचा प्रतिकार केल्यामुळे ते रोकड व माल नेण्यात अपयशी ठरले असले तरी दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात गुरुदासाणी कुटुंबातील पाचजण गंभीर जखमी झाले.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडेखोर शीतलचंद गुरुदासाणी यांच्या घरात शिरले. हॉलमध्ये झोपलेल्या शीतलचंद गुरुदासाणी (२७) यांच्या गळयातील सोन्याची साखळी तोडून पळविण्याच्या प्रयत्न केला. मात्र शितल यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार केला. दरोडेखोरांनी चाकूहल्ला करून त्यांना जखमी केले. त्यानंतर दरोडेखोरांनी लाजवंती गुरुदासाणी, मनीष गुरुदासाणी, विकास गुरुदासाणी, शीतलचंद गुरुदासाणी यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांच्याकडील दागिने व ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. गुरुदासाणी कुटुंबीयांनी प्राणपणाने त्यांचा प्रतिकार केल्यामुळे ते फारसा ऐवज व दागिने लंपास करू शकले नाहीत. गुरुदासाणी कुटुंबातील तीन सदस्यांनी अतिशय धर्याने एका दरोडेखोरास पकडून ठेवले. इतरांनी घटनास्थळावरून पळ काढण्यात यश मिळविले. बाहेर लपून बसलेल्या काही दरोडेखोरांनी गुरुदासाणी यांच्या घरावर तुफानी दगडफेक केली.
आरडाओरड ऐकून वसाहतीतील नागरिक जमा झाले. जखमींना तातडीने चिखलीच्या खेडेकर व तनपुरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच चिखलीचे ठाणेदार दिलीप तडवी ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. दरोडेखोरांना पकडण्यासाठी रात्रीच नाकेबंदी करण्यात आली. श्वानपथकासही पाचारण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीाक्षक श्याम दिघावकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक नम्रता पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी ठाणेदार तडवी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गुरुदासाणी कुटुंबीयांनी पकडून ठेवलेल्या आरोपीचे नाव प्रवीण मुंगनाथ शिंदे  (३०)रा. देऊळगाव राजा असे असून पोलीस त्याच्याकडून इतर आरोपींची नावे मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक आरोपी पकडल्याने सर्व आरोपी लवकरच जेरबंद होतील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक दिघावकर यांनी सांगितले.  जिल्ह्य़ात व शहरी भागात दरोडे व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गुरुदासाणी यांच्या घरावरील दरोडय़ामुळे चिखलीत दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.