कर्जत तालुक्यातील कठिणदेव या परिसरात नगर-सोलापूर रस्त्यावर आज मध्यरात्री श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील दीपक अशोक दातीर या ट्रकचालकावर चाकूने हल्ला करून त्यांच्याकडील १३ हजार ८०० रूपयांची रोकड व इतर माल लुटण्याची घटना घडली.
या बाबत कर्जत पोलीस ठाण्यात दीपक दातीर याने फिर्याद दिली आहे. मध्यरात्री ते ट्रक (एमएच १२ एफटू ३४५१) घेऊन नगरहून सोलापूरकडे जात असताना कर्जत तालुक्यातील नागमठाण शिवारातील कठिणदेव परिसरात पाठिमागून अचानक निळया व काळया रंगाच्या दोन पल्सर मोटारसायकलवर चौघेजण आले. त्यातील दोघांनी गाडीत घुसून चालक दीपकच्या हातावर चाकूने वार केला व गाडीचा ताबा घेतला, दरम्यान, गाडीचा क्लिनर दिनेश राजमल याच्या पोटावर चाकूचे वार करून त्यालाही जबर जखमी करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वत: ट्रक चालवत ज्योतीबावाडी या कच्चा रस्त्याला घेतला व दीपककडील १३ हजार ८०० रूपये रोकड व दोन मोबाईल घेऊन ते सर्वजण पळून गेले. सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.