डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा व वाङ्मय विभागाच्या वतीने ‘साहित्योत्सव २०१३’चे आयोजन शनिवारी (दि. ३०) सकाळी साडेदहा वाजता करण्यात आले आहे. याचे उद्घाटन संत साहित्यिक डॉ. यु. म. पठाण यांच्या हस्ते होणार आहे. पद्मश्री मिळाल्याबद्दल विभागाच्या वतीने डॉ. पठाण यांचा सत्कार या वेळी करण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रत्नदीप देशमुख व डॉ. भारत हंडीबाग उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता वनस्पती उद्यानासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ‘साहित्य जागर’ फेरी निघणार आहे. दुपारच्या सत्रात विद्यार्थी विविध गुणदर्शन सादर करतील. समारोपप्रसंगी साहित्योत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिसांचे वितरण प्रा. मुरलीधर शिनगारे यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती साहित्योत्सवाचे समन्वयक डॉ. रमेश जाधव, विभागप्रमुख डॉ. परशुराम गिमेकर व डॉ. मीरा घाडगे यांनी पत्रकाद्वारे दिली.