जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पध्रेत वरिष्ठ महाविद्यालय गटात अर्जुनी मोरगाव येथील भूमेश्वर कापगते, तर कनिष्ठ महाविद्यालय गटात साक्षी कटरे प्रथम आली. त्यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व एक वृक्ष देऊन प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन साबळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दोन्ही विजेत्यांची राज्यस्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पध्रेसाठी निवड झाली असून येत्या १२ जानेवारी रोजी ही स्पर्धा होणार आहे.
जिल्हास्तरीय स्पध्रेत तालुका स्तरावर प्रथम व व्दितीय आलेले कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय गटातील ३१ स्पर्धक सहभागी झाले होते. कनिष्ठ महाविद्यालय गटात सडक अर्जुनी येथील उमेश लाडे दुसरा, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रसन्नजीत ढाली तृतीय पुरस्काराचा मानकरी ठरला. त्यांना अनुक्रमे सात व पाच हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व एक वृक्ष देऊन गौरविण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालय गटातून गोरगाव येथील मनोज कोल्हे व गोंदिया येथील मयूर कावळे यांनी व्दितीय पुरस्कार पटकाविला. त्यांना सहा हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व एक वृक्ष देऊन परीक्षक व जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, प्रा. कविता राजाभोज, प्रा. डॉ. ललिता रायचौधरी, सामाजिक कार्यकर्त्यां अँड.माधुरी रहांगडाले यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे, दोघांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी केवळ स्पध्रेपर्यंत मर्यादित न राहता प्रत्यक्षात कृतीतून स्वच्छतेप्रती जनजागृतीसाठी प्रयत्न करावे, ही एक सामाजिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन साबळे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पाणी पुरवठा पाणी गुणवत्ता व स्वच्छता या बाबींची जागृती करण्यासह प्रत्येक महाविद्यालयातून पाणी व स्वच्छतेबाबत संदेश वाहक व अभ्यासू वक्ते तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
जिल्हास्तरीय स्पध्रेला सकाळी ११.३० वाजता सुरुवात करण्यात आली. दरम्यान, दुपारी चार वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. तालुकास्तरीय प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कार विजेत्यांना सुध्दा यावेळी प्रत्येकी पाच, तीन व दोन हजाराचे धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सर्व विजेत्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, बांधकाम सभापती विजय रहांगडाले, महिला व बालकल्याण सभापती संगीता दोनोडे, समाजकल्याण सभापती श्रावण राणा, पशुसंवर्धन सभापती उमाकांत ढेंगे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.