विशेष मुलांची घरच्या जवळिकीने काळजी घेणाऱ्या अमेय पालक संघटनेचा कृतज्ञता दिवस डोंबिवलीजवळील खोणी गावातील घरकुलात अत्यंत भावुक वातावरणात पार पडला.
निरनिराळ्या वयोगटांतील गतिमंद तसेच मतिमंद मुलांनी नातेवाईक, आत्मस्वकीय तसेच परिसरातील तीनेशके संवेदनशील नागरिकांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.    
‘संपत्तीच्या विकृत प्रदर्शनाची हौस जडलेल्या सध्याच्या समाजात सामाजिक भान असलेली काही माणसे कोठे तरी सक्रिय आहेत. त्यामुळे अमेय पालक संघटनांसारखी विकासाची बेटे आपणास पाहण्यास मिळत आहेत. शासनाकडून अशा सामाजिक कार्याला मदत मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याने बांधीलकी ठेवून समाजाने ‘अमेय’सारख्या सामाजिक संस्थांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बळ दिले पाहिजे. ते कायमस्वरूपी टिकून राहील हे पाहिले पाहिजे,’ असे मत ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमास संस्थेचे कार्यकर्ते लीलाधर कुलकर्णी, अरुण खाडिलकर, अविनाश बर्वे, सावित्रीबाई कुलकर्णी, शमी कुबेर, सरपंच गणेश ठोंबरे उपस्थित होते.  
‘बाहेरच्या व्यवस्थेत सर्वत्र प्रत्येकाची मनोरुग्णासारखी अवस्था झाली आहे. त्यामुळे निसर्गाने आघात केलेली ही शिस्तबद्ध मतिमंद मुले पाहिली की, आपण माणसामध्ये आल्याचे भान येते, अशी सध्याची परिस्थिती आहे. संपत्तीचे अश्लील प्रदर्शन आणि बाजारपेठीय मूल्यांच्या कौतुकात अडकलेला समाज सामाजिक कार्यापासून दूर गेला आहे. सामाजिक जबाबदारीचे आपले कर्तव्य आपण हरवून बसलो आहोत. याउलट अमेरिकेसारख्या देशात सामाजिक कार्यासाठी कोटय़वधींचा निधी जमा करून भारतात विधायक कार्यासाठी वापरला जातो. आपण भारतीय फक्त प्राप्तिकर, टीडीएस या जंजाळात अडकून पडलो आहोत. सामाजिक, राष्ट्रीय भान आपणास येत नाही, तोपर्यंत भयाण दुष्काळ, बाबा, बापूंची चंगळगिरी ही सुरूच राहणार आहे,’ अशी खंतही कुबेर यांनी व्यक्त केली.
मतिमंद मुले, नालंदा विद्यापीठाच्या नृत्यांगनांनी या वेळी गाणी सादर केली. ‘हे जीवन सुंदर आहे’ या मतिमंदांनी सादर केलेल्या गाण्याच्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडांना पाझर फुटला होता. या कार्यक्रमात अमृत महोत्सवानिमित्त लीलाधर कुलकर्णी, सेवक रमेश गोडांबे, डॉ. ऊर्मिला कैसर, मिलिंद लोळगे, मानसी कुलकर्णी, गुरुप्रसाद पांडे व कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला. विविध स्पर्धातील यशस्वी मतिमंद मुलांना पारितोषिके देण्यात आली. बक्षिसे मिळतील म्हणून तब्बल तीन तास शिस्तीत बसलेल्या मतिमंद मुलांचा संयम उपस्थितांना शिस्तीचे धडे देत होता. प्रास्ताविकात अरुण खाडिलकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. प्रत्येकाने आपल्या सवडीप्रमाणे खोणी येथील घरकुल संस्थेत येण्याचे आवाहन केले. मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरांतील विविध क्षेत्रांतील नागरिक या वेळी उपस्थित होते.  सूत्रसंचालन अविनाश बर्वे, मानसी आमडेकर यांनी केले. आभार डॉ. सुनील शहाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रंजन जोशी, सुनील जाधव, मुकुंद जोशी, सुरेखा उपाध्ये, नंदिनी बर्वे आदींनी मदत केली.