जी. के. गुजर ट्रस्टच्या डॉ दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या शाखेतील अंतिम वर्षांतील विद्यार्थी समृध्द कामत याने, आपल्या अंतिम वर्षांतील प्रकल्पासाठी स्कॅन नावाचे कर्णचिकित्सा करणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे.
सध्या हॉस्पिटलमध्ये कर्ण तपासणीसाठी वापरण्यात येणारे ‘ऑडीओमीटर’ हे यंत्र वापरण्यास फारच अवघड असून, ते केवळ ठराविक कार्यच करते. त्यामुळे सध्या कॅलक्युलेशन्स, ऑडीओग्राम (श्रवण क्षमतेचा आलेख) काढणे व कर्णदोष आहे किंवा नाही हे पडताळण्याची सर्व कामे डॉक्टर्सनांच करावी लागत आहेत. या सर्व कारणांमुळे ऑडीओलॉजीचे ज्ञान नसलेल्या सामान्य मनुष्याला ते वापरता येणे शक्य होत नाही.
जुन्या पध्दतीमधील हे सर्व दोष कामत याने बनवलेल्या सॉफ्टवेअरमध्ये दूर केले गेले आहेत. संपूर्ण स्वयंचलित असे हे सॉफ्टवेअर असून, याची वैशिष्टय़े अशी आहेत की, यास अतिरिक्त हार्डवेअरची आवश्यकता नाही. यात थ्रेशोल्ड्सचे अचूक मापन करण्याची व ऑडीओग्राम काढण्याची सोय आहे. हे निकालांचे परीक्षण, कर्ण दोषांचे अस्तित्व व उपाय सर्व काही अचूकरीत्या देते. याचे खास वैशिष्टय़े म्हणजे हे मराठी भाषेतदेखील वापरता येते. असे हे एक समाजोपयोगी सॉफ्टवेअर कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्टरांसाठी एक वरदान ठरणार आहे. या सॉफ्टवेअरविषयी आपले मत व्यक्त करताना समृध्द कामत याने सांगितले की, अशाप्रकारचे हे पहिलेच सॉफ्टवेअर असून, याचे पेटंट मिळू शकते. आपल्या भारतात अनेक शोध लागूनही केवळ पेटंट न घेण्यामुळेच आजही डॉ. माशेलकरांसारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांना हळदीच्या पेटंटसाठी अमेरिकेशी भांडावे लागले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या संशोधनाचे पेटंट घ्यावे.
या प्रकल्पासाठी कामत यास प्रा. सोनाली सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले असून, विभागप्रमुख मनीषा बिरनाळे व प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांचे प्रोत्साहन आणि डॉ. मुबीन संदे व नायर हॉस्पिटल मुंबई यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. प्रकल्प यशासाठी समृध्द कामत यांचे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, उपाध्यक्ष इंद्रजित गुजर, सचिव डॉ. माधुरी गुजर, प्राचार्य डॉ. अजय देशमुख तसेच सर्व विभाग प्रमुख, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.