News Flash

तहसीलदारांवर ट्रॅक्टर घातला!

जिल्ह्य़ात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच असून, शनिवारी भरदुपारी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या अंगावर वाळूमाफियांनी ट्रॅक्टर घातला व जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

| August 11, 2013 01:58 am

जिल्ह्य़ात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच असून, शनिवारी भरदुपारी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या अंगावर वाळूमाफियांनी ट्रॅक्टर घातला व जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच बाजूला उडी मारल्याने सुदैवानेच कडवकर या घटनेतून बचावले. यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. अन्य पाच ट्रॅक्टरचालक मात्र पळून गेले. बासंबा पोलीस ठाण्यात या प्रकरणी स्वत: कडवकर यांनीच फिर्याद दिली. त्यानुसार पळून गेलेल्या ट्रॅक्टरचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
पातोंडाच्या वाळूघाटात दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. येथील अवैध वाळूउपसा थांबविण्यास कडवकर हे पथकासह गेले होते. या घटनेविषयी कडवकर यांनी सांगितले की, विदर्भ व मराठवाडय़ातून वाहणाऱ्या पेनगंगा नदीच्या पातोंडा वाळूघाटाच्या पूर्वलिलावाची मुदत ३१ जुलैला संपली. नव्याने लिलाव प्रक्रियेची कार्यवाही सुरू आहे. पातोंडा वाळूघाटावर मोठय़ा प्रमाणावर अवैध वाळूउपसा होत असल्याची या भागातील शेतकऱ्यांची तक्रार होती. त्यामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास आपण तेथे गेलो होतो. या वेळी अवैध वाळूउपसा करणारे ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता एका ट्रॅक्टरचालकाने आपल्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बाजूला उडी मारल्याने बचावलो. सहकाऱ्यांच्या मदतीने एमएच ३८ बी ३७९४) व एमएच ३८ बी ३०३३ हे दोन ट्रॅक्टर जप्त केले, तर एमएच ३० जे ५४६५, एमएच २९ व्ही १७२८, एमएच २९ व्ही ९६५ व एमएच २९ सी ३६२० या क्रमांकाचे ट्रॅक्टरचालक पळून जाण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, ताब्यात घेतलेले दोन ट्रॅक्टर राजू विलास नागरे याचे असून वाळूच्या बाजारभावाच्या किमतीपेक्षा तीनपट दंड त्यांच्याकडून आकारण्यात येणार आहे, असे कडवकर यांनी स्पष्ट केले. मात्र, अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पळून गेलेल्या ट्रॅक्टरचालकांविरोधात संध्याकाळी उशिरा कडवकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2013 1:58 am

Web Title: sand mafias tried to kill tehsildar
Next Stories
1 खड्डय़ांच्या आडून साधला ‘मनसे’ ने मनपावर निशाणा!
2 इमारतींच्या दुर्दशेने शिक्षणाचा खेळखंडोबा!
3 जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिक्षकांना अनिवार्य
Just Now!
X