प्रवरा नदीपात्र कोरडे पडल्याने शहराला सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दिवसाआड आणि तोही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने मिळते ते पाणीही अधिक क्षारयुक्त असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप करत पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी केली आहे.
शहराचा पाणीपुरवठा सर्वस्वी भंडारदरा व निळवंडे धरणावर अवलंबून आहे. नदी वाहती असली तर शहराला भरपूर पाणी मिळते. नदीपात्र कोरडे पडले की शहरातही पाण्याचा ठणठणाट होतो. अशीच स्थिती सध्या उद्भवली आहे. धरणे भरलेली असली तरी नदीपात्रात पाणी नसल्याने शहराचा पाणीपुरवठा दिवसाआड होत आहे. काही भागांत तर चार-चार दिवस पाणी मिळत नाही अशी स्थिती आहे. मिळते ते पाणीही अतिशय क्षारयुक्त असते. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागल्याचे वाकचौरे यांचे म्हणणे आहे. ऐन सणासुदीचा काळ, मुबलक पाणी नाही, आहे त्या पाण्यामुळे रोगराईचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर नदीला आवर्तन सोडण्याची मागणी वाकचौरे यांनी केली आहे.