काँग्रेस पक्षाला अखेर नगरमध्ये शहर जिल्हाध्यक्ष मिळाला. या पदावर ब्रिजलाल सारडा यांची प्रभारी अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सुचनेनुसार प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील यांनी आज दिले. सारडा यांच्यावर पक्षातील कोणत्याही गटा-तटाचा शिक्का नाही. त्यामुळे पक्षातील थोरात व विखे या दोन्ही गटांनी त्यांच्या नावाचा स्वीकार केला. शहरात पक्षाची संघटना बांधणी करुन महापालिकेत व भिंगार छावणी मंडळात पक्षाची सत्ता आणणे यासाठी आपले प्राधान्य राहील, असे सारडा यांनी सांगितले.
पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे, तसेच आपल्यासमोर मोठे आव्हानही आहे, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे या दोघांनीही आपल्यावर विश्वास टाकला व एकमताने पदासाठी संमती दिली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो, गटा-तटाचा विचार न करता आपण पक्ष बांधणी करुन आगामी निवडणुकांत पक्षाला विजय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करु, पक्षाने टाकलेल्या जबाबदारीमुळे आपण समाधानी आहोत, असे सारडा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
गुन्ह्य़ात अडकलेल्या भानुदास कोतकरला पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर, गेल्या सुमारे पावणेदोन वर्षांपासून शहर जिल्हाध्यक्ष पद रिक्तच होते, मध्यंतरी काही दिवस राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये परतलेल्या विनायक देशमुख यांची प्रभारी अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती, मात्र महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशमुख यांना पदावरुन हटवले. त्यापुर्वीही देशमुख पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष होते, प्रभारी म्हणुनच त्यांनी साडेचार वर्षे काम पाहिले. आताही सारडा यांची नियुक्ती प्रभारी म्हणुनच झाली आहे, त्यामुळे पक्षाची प्रभारी परंपरा कायम आहे.
जिल्ह्य़ात पक्षाची ग्रामीण संघटना विखे गटाकडे तर नगर शहर संघटना थोरात गटाकडे अशी अघोषित वाटणी झालेली आहे. त्यामुळे सारडा यांची नियुक्ती करण्यापुर्वी मंत्री थोरात यांची प्रदेश पातळीवरुन संमती घेतली गेल्याचे समजले. शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत होती परंतु थोरात गटात अद्यापि ‘कोतकर लॉबी’ सक्रिय असल्याने त्याचाही विचार झाल्याचे सांगितले जाते. सारडा यांची प्रभारी अध्यक्ष म्हणुन नियुक्ती झाली असली तरी त्यांचीच नियुक्ती कायम होईल, असे मानले जाते. सारडा हे केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
सारडा कुटुंबिय त्यांच्या आजोबा, वडिलांपासून गांधी-नेहरु घराण्याची बांधिलकी मानणारे आहेत. ब्रिजलाल १९७४ पासून पक्षात सक्रिय आहेत. १९७५ ते ८८ पर्यंत त्यांनी प्रदेश युवकमध्ये उपाध्यक्ष व सरचिटणीस म्हणुन काम केले. प्रदेश युवकमध्ये ते व विद्यमान प्रदेशाध्यक्ष ठाकरे एकाचवेळी कार्यकारिणीत होते, त्यामुळे सारडा यांची निवड होताना ही बाबही महत्वाची ठरली. १९९१ ते २००१ अशी १० वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणुनही काम केले. नगर अर्बन सहकारी बँकेचे ते अनेक वर्षे संचालक होते. १९९९ मध्ये त्यांनी नगरमधुन विधानसभेची निवडणूक लढवली होती.