सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल होणाऱ्या बाहेरगावच्या गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी सरस्वती एज्युकेशन अॅन्ड हेल्थ फाउंडेशनच्या वतीने सरस्वती आहार योजना राबविली जाते. या योजनेला दोन वर्षे पूर्ण होऊन तिसऱ्या वर्षांला प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षांत या योजनेचा लाभ ३१ हजार ५०० जणांनी घेतला आहे.
सरस्वती आहार योजनेच्या तिसऱ्या वर्धापनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात राउंड टेबल इंडियाचे अध्यक्ष विनीतभाई पारेख यांच्या हस्ते रुग्ण व त्यांच्या गरजू नातेवाइकांना आहाराचा लाभ देण्यात आला. या योजनेसाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. ए. जमादार, अधिसेविका एन. बी. शेख-सौदागर, तसेच नगरसेवक सय्यद बाबा मिस्त्री आदींचे नेहमीच सक्रिय सहकार्य लाभत असल्याचा उल्लेख सरस्वती फाउंडेशनचे विश्वस्त अजय बाहेती यांनी केला. दररोज गरजू पन्नास रुग्ण व त्यांचे नातेवाईक या योजनेचा लाभ घेतात. प्रत्येक सणाच्या वेळी मिष्टान्न भोजन दिले जाते, अशी माहितीही बाहेती यांनी दिली. राउंड टेबल इंडियाचे अध्यक्ष पारेख यांनी या स्तुत्य व मानवतावादी सेवेची प्रशंसा करीत समाजातील अन्य मंडळींनी याचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास वासुदेव बंग, तिलोकचंद मुनोत, रवींद्र आरकाल, अनिल पटवारी, प्रमिला श्रीनिवासन, सरिता बाहेती, सतीश लाहोटी, महेश देशमुख, ब्रिजेश गांधी, विजय तापडिया, पराग शहा, नीलेश जाजू, माजी नगरसेवक रमेश राठी, महेंद्र चाटला, अमित चंडक आदींची उपस्थिती होती.