दूरदर्शनवरील ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमानंतर देशभरातून मिळालेल्या आर्थिक मदतीमधून स्नेहालयने उभारलेल्या सत्यमेव जयते भवनाचे लोकार्पण या कार्यक्रमाचा सादरकर्ता तथा प्रसिध्द अभिनेता अमीर खान याच्याच हस्ते उद्या (शनिवार) प्रजासत्ताकदिनी होणार आहे. स्नेहालयच्या एमआयडीसीतील प्रकल्पात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
साधारणपणे वर्षभरापूर्वी दूरदर्शनवर अमीर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात स्नेहालय संस्थेतील सामाजिक कामांची दखल घेण्यात आली. हा कार्यक्रम प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातून स्नेहालयकडे मदतीचा ओघ सुरू झाला. रिलायन्स समुहासह अनेकांनी संस्थेला भरभरून मदत पाठवली. या निधीतूनच स्नेहालयमध्ये अन्याय व समस्याग्रस्त महिलांसाठी सत्यमेव जयते भवन उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण अमीर खानच्याच हस्ते होणार आहे. यानिमित्ताने अमीर खान प्रथमच नगरमध्ये येत आहे. सुमारे वीस हजार चौरस फुटांच्या या संकुलात दोनशे महिलांची निवास व्यवस्था, रोजगार प्रशिक्षण केंद्र, समुपदेशन केंद्र, भोजनालय, कार्यालय आदी गोष्टींचा समावेश आहे. स्नेहालय परिवारातील स्नेहाधार केंद्र या भवनाच्या प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहणार आहे.
स्नेहालयमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास अमीर खानच्याच इच्छेनुसार निवडक निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे, मात्र रेडिओ नगर (९०.४० एफएम) वाहिनीवरून दुपारी ४ पासून या कार्यक्रमाचे थेट समालोचन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्नेहालयमधून देण्यात आली. लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन परवा (रविवार) हे भवन नगरकरांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुवालाल शिंगवी, संजय बंदिष्ठी, संजय गुगळे, मीना शिंदे, राजीव गुजर, शाम आसावा आदींनी केले आहे.