शीळ-डायघर येथे धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ७४ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने केलेल्या लक्षणीय कामगिरीमुळे ६२ जणांचे प्राण वाचू शकले. इंडियन एक्स्प्रेसचे प्रतिनिधी श्रीनाथ राव यांनी कारवाईत सहभागी झालेल्या दलातील संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या जिवांना वाचविण्याच्या या मोहिमेचे उभे केलेले शब्दचित्र..
शीळ-डायघर येथील सात मजली अनधिकृत इमारत ४ एप्रिलच्या संध्याकाळी सहा वाजता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीत तब्बल १३० जण अडकून पडले होते. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलास (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले. कोसळलेल्या इमारतीभोवती आत अडकून पडलेल्या रहिवाशांच्या नातेवाईकांचा गराडा होता. त्यांना न दुखावता परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे हे आपत्ती निवारण दलापुढील सर्वात मोठे आव्हान होते.
‘अशा परिस्थितीत आम्ही सर्वात आधी आपत्तीग्रस्त परिसर पूर्णत: प्रतिबंधित करतो. त्यानंतरच पुनर्वसन व मदत कार्य सुरू होते. मात्र येथील परिस्थिती थोडी संवेदनशील असल्याने तो नियम बाजूला ठेवावा लागला, अशी माहिती ‘एनडीआरएफ’च्या पाचव्या तुकडीचे कमांडंट अलोक अवस्थी यांनी दिली. मुंबई-पुणे पूर्व द्रूतगती मार्गालगत तळेगाव येथे असलेल्या या तळावरून अधिकाऱ्यांसह ९४ जवान आणि श्वानपथक घटनास्थळी रवाना झाले.
‘तिथे स्थानिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती आणि त्यातील बहुतेकांना मदत कार्यात भाग घ्यायचा होता. आम्हाला त्यांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, पण त्याचवेळी आमच्या कार्यात त्यांचा अडथळा येऊनही चालणार नव्हते. अखेर आम्ही त्यांना मृतदेह शववाहिन्यांपर्यंत वाहून नेण्यास परवानगी दिली,’ असे अवस्थी म्हणाले.  
जिल्हा प्रशासनाकडून दुर्घटना आणि पुनवर्सन कामांविषयी थोडक्यात माहिती घेतल्यानंतर ‘एनडीआरएफ’च्या चमूने कारवाईची सूत्रे आपल्या हाती घेतली. इमारतीच्या ढिगाखाली अनेक जीव अडकून पडल्याचा अंदाज असल्याने अतिशय सावधपणे आणि तितक्याच जलद गतीने माती आणि काँक्रीटचे ढिगारे उपसावे लागणार होते. अवस्थी म्हणाले, ‘आम्ही सर्वप्रथम ताबडतोब जेसीबी यंत्रे थांबवली. कारण त्यांच्या दिशाहीन उत्खननामुळे आत अडकलेली माणसे जखमी होण्याची भीती अधिक होती. त्याऐवजी आम्ही त्यांना ढिगातील एकेक मोठा स्लॅब बाजूला करण्याची सूचना केली. कारण आम्हाला लवकरात लवकर आमची यंत्रणा घेऊन आत शिरायचे होते. अर्थातच या कामास थोडा अधिक वेळ लागत असला, तरी नंतर लोकांनाही हीच पद्धत बरोबर असल्याचे समजले.’
जपानमध्ये २०११मध्ये सुनामीमुळे उद्भवलेल्या आपत्तीत अलोक अवस्थींनी पुनर्वसन कार्यात भाग घेतला होता. जपानमधील ओनागवा येथे हजारो लोक सुनामीमुळे मृत तसेच बेघर झाले होते. त्यावर्षी डिसेंबर महिन्यात भारत भेटीवर आलेले जपानचे पंतप्रधान योशिहिको नोडा यांनी त्यावेळी अवस्थींच्या चमूने केलेल्या मदत कार्याचा विशेष उल्लेख करून त्यांचे कौतुक केले होते.
अवस्थी म्हणाले, ‘येथे आम्हाला दोन देशांमधील नागरिकांच्या स्वभावातील फरक ठळकपणे दिसला. ओनागवामध्ये आम्ही कोसळलेल्या बहुमजली इमारतींच्या ढिगाखाली अडकलेल्यांची सुटका करण्याचे काम केले. तिथे एकदा इमारतीचा परिसर आम्ही आमच्या ताब्यात घेऊन सील केला की, स्थानिक नागरिक तिथून दूर होत. भारतात नेमके उलटे घडते. इथे प्रत्येकाला अशा परिस्थितीतही आधी आपल्या नातेवाईकाची ख्यालीखुशाली जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे येथे परिस्थिती काळजीपूर्वक हाताळावी लागते.      
 अशा प्रकारच्या इमारत दुर्घटनेत अपवादात्मक परिस्थितीत ‘एनडीआरएफ’ला पाचारण केले जाते. शीळमधील इमारत दुर्घटना अधिक गंभीर असून स्थानिक आपत्ती निवारण दल अपुरे ठरले असते. या दुर्घटनेत स्थानिक पथक फारशी परिणामकारक कामगिरी करू शकणार नाही, हे त्वरित लक्षात आल्याचे महापालिका आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले.   
अवस्थी म्हणाले, ‘जेव्हा जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी आम्हाला या इमारतीच्या ढिगाखाली १३० लोक अकडल्याची माहिती दिली, तेव्हा ही तिसऱ्या दर्जाची आपत्ती असल्याचे आमच्या लक्षात आले. राज्याची आपत्ती निवारण यंत्रणा अशा प्रसंगात अपुरी पडते. सहा वाजता इमारत कोसळली. ‘एनडीआरएफ’ला या घटनेविषयी कळविले तेव्हा सात वाजून २० मिनिटे झाली होती. अवघ्या १५ मिनिटांत एनडीआरएफचे पथक तयार झाले. रस्त्यातील वाहतूक कोंडीमुळे हे पथक काहीसे उशिराने तीन तासांनी घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत महापालिकेचे पथक संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे कार्यरत होते.
शोधा आणि वाचवा
इमारतीच्या ढिगाखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या टीमने दोन प्रकारच्या जीवशोधक यंत्रणा वापरल्या. पहिल्या प्रकारची यंत्रणा डेब्रिजमध्ये जाऊन तिथे अडकलेल्या रहिवाशांच्या आवाजाचा वेध घेऊ शकत होते, तर दुसरे यंत्र पृष्ठभागावरूनच ५०० मीटर अंतरावरील हृदयांची स्पंदने टिपू शकते, अशी माहिती अवस्थींनी दिली. दोन्ही प्रकारची ही यंत्रे ढिगाऱ्याखालच्या आवाजाचा वेध घेत असताना, दुसरीकडे ऊर्मी, उदय आणि  बेर्किले या तीन श्वानांनी सर्व परिसर हुंगण्यास सुरुवात केली. दुसऱ्या एका चमूने स्लॅबला एक भोक पाडून त्यातून लाकडी खांबाला बांधलेला एक कॅमेरा आत सोडला. त्यासोबत बॅटरी आणि मायक्रोफोनही असतो. त्यामुळे अडकलेल्या व्यक्तीशी बचाव पथकास संवाद साधणे शक्य होते. अशा प्रकारचे प्रयत्न गुरुवारी रात्रभर इमारतीच्या सर्व मजल्यांवर सुरू होते. अवस्थींनी दिलेल्या माहितीनुसार  इमारतीच्या ढिगाखालून दर १५ मिनिटांनी एकाला बाहेर काढले जात होते.
पुनर्वसन कार्यास खऱ्या अर्थाने उत्तररात्री गती आली. श्वानांनी सातव्या मजल्यापासून त्यांच्या कामास सुरुवात केली. एका श्वानाने पीडित व्यक्तीला हुंगले की, त्याला उचलून दुसऱ्याला तिथे सोडून खात्री करून घेतली जात होती. अशाप्रकारे एकेक मजल्याचा शोध घेतला जात होता. अवस्थी म्हणाले, एकेक करून मृत तसेच जखमी व्यक्तींना बाहेर काढले जात होते. जिवंत व्यक्तीस बाहेर काढल्यावर तातडीने त्याच्या जखमांचा आढावा घेतला जात होता. त्याच्यावर प्रथमोपचार करून त्वरित त्याची रवानगी रुग्णवाहिकेत केली जात होती.
मृत्यूवर विजय
या दुर्घटनेत ७४ जण दगावले. मात्र तब्बल ६२ जण अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परतले. त्यातले बरेचसे श्रेय एनडीआरएफच्या चमूस दिले जाते. डेब्रिजच्या ढिगाखाली अडकलेल्या एका महिलेस शुक्रवारी तब्बल २४ तासांनंतर बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्या आल्या तिने एक दीर्घ श्वास घेतला. अवस्थी म्हणतात, बहुतेक २४ तासांनंतर तिने घेतलेला तो पहिला मोकळा श्वास होता. त्याच संध्याकाळी बचाव दलास काँक्रीटच्या स्लॅबमध्ये अकडलेल्या ५४ वर्षीय महिलेस बाहेर काढण्यात यश आले. तोंडावरील एका छोटय़ा ओरखडय़ाव्यतिरिक्त तिला कुठेही इजा झालेली नव्हती, अशी माहिती बचाव पथकातील अधिकारी पंडित इथापे यांनी दिली. ते म्हणाले, एवढी वयस्कर महिला इतका काळ सुरक्षित राहिली, हे एक आश्चर्यच आहे. मात्र तिला बहुतेक श्वास घेता येत असावा. अखेर आम्ही स्लॅबला भोक पाडून त्यातून तिला अलगद वर घेतले. इमारत कोसळत असल्याचे पाहून घरातील वडिलधाऱ्यांनी लहान मुलांना सुरक्षित जागी हालविण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी स्वयंपाक खोलीचा आश्रय घेतला. तिथे त्यांना पाणी उपलब्ध होते. त्यामुळे मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते तिथे वाट पाहत राहिले.     
लहान मुले वाचल्याचे समाधान
 या बचाव कार्यात अनेक लहान मुलांचे जीव वाचू शकले ही ‘एनडीआरफ’च्या पथकासाठी सर्वात समाधानकारक बाब होती. अवस्थी म्हणाले, ढिगाऱ्याखालून एखादी जिवंत व्यक्ती बाहेर आली की आमच्या कामास हुरूप येत होता. तब्बल ३६ तास हे शोधकार्य सुरू होते. अवस्थींच्या पथकाने गेल्या चार वर्षांत अशा प्रकारच्या ५६ बचाव कार्यात भाग घेऊन ३६८ लोकांचे प्राण वाचविले आहेत.
 इमारत दुर्घटना घडल्यापासून ४२ तासांनी शनिवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी बचाव कार्य संपले. त्यांना एकूण ७२ मृतदेह सापडले. शनिवारी सकाळी नऊ वाजता इमारत जमीनदोस्त करण्यास त्यांनी प्रारंभ केला आणि अवघ्या काही तासांत ते काम पूर्ण झाले. अवस्थींच्या मतानुसार या इमारतीच्या बांधकामात काँक्रीट वापरलेच गेले नसावे. कारण अगदी सहजपणे हे बांधकाम कोसळत होते. अशा प्रकारच्या दहा इमारती एकाच वेळी कोसळल्या तर? आपण कल्पनाही करू शकणार नाही. लकी कंपाऊंडमधील ही इमारत म्हणजे जणू काही सात मजली स्मशानच होते.
एनडीआरएफ टीम-
९४ जवानांचे दोन चमू, तीन अधिकारी आणि तीन श्वानांचे पथक.
 सहा वाजता इमारत कोसळली.
 सात वाजता ही दुर्घटना राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर झाले.
 सात वाजून २० मिनिटांनी एनडीआरएफला कळविण्यात आले.
१०.३० मिनिटांनी ते घटनास्थळी पोहोचले.
दोन दिवसांनंतर शनिवारी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी हे बचाव कार्य संपले.
श्रद्धांजलीसाठीही उसंत नाही..
जपानमध्ये आम्हाला कुणीही जिवंत सापडण्याची शक्यता नव्हती, त्यामुळे मृतदेह मिळाला की आम्ही एक मिनिट स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहत होतो. मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेत ते शक्य नव्हते, कारण आत अनेक जण जिवंत अडकून पडले होते. त्यांना शक्य तितक्या लवकर बाहेर काढणे आवश्यक होते. त्यामुळे श्रद्धांजली वाहण्यापुरताही वेळ आम्हाला वाया घालवायचा नव्हता.